सिन्नरसह तालुक्यात बिबट्याची दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 14:39 IST2019-06-13T14:38:53+5:302019-06-13T14:39:43+5:30
सिन्नर : जंगलातील बहुतांश ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटल्याने बिबटे नागरी वस्त्यांच्या आश्रयाला आले आहेत. सिन्नरसह सरदवाडी, दापूर येथे बिबट्यांची दहशत कायम आहे.

सिन्नरसह तालुक्यात बिबट्याची दहशत कायम
सिन्नर : जंगलातील बहुतांश ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटल्याने बिबटे नागरी वस्त्यांच्या आश्रयाला आले आहेत. सिन्नरसह सरदवाडी, दापूर येथे बिबट्यांची दहशत कायम आहे. कुंदेवाडी, चापडगाव येथे प्रत्येकी एक बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर दहशत असलेल्या गावांत पिंजरे लावण्याची मागणी होत आहे. सिन्नरच्या मुक्तेश्वर नगरालगत बिबट्याचे तीन महिन्यांपासून वास्तव्य आहे. काही दिवस पिंजरा लावून बिबट्या त्यात अडकला नाही. त्यामुळे तो काढून घेण्यात आला असला तरी बिबट्याचे दर्शन होत असल्याने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. सरदवाडीत दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. बजूनाथ शिरसाठ यांच्या शेतीलगत बिबट्या सायंकाळी सहालाच नजरेस पडतो. शेतातील चारा आणणेही शेतकºयांना अवघड होऊन बसले आहे. रात्रीच्या वेळी तर वस्तीवरील शेतकºयांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. दापूर येथील मोहन काकड यांच्या डाळिंबाच्या शेतात बिबट्याचा मुक्काम आहे. नर व मादी असे दोन बिबटे महिनाभरापासून परिसरात भटकंती करताना आढळून येत आहेत. वस्त्यांवरील भटकी कुत्रीही या बिबट्यांचा शिकार बनली आहेत. काकड यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांनी पाहणी केली.