सिंहस्थ कुंभमेळा : कावनईत सोहळ्याची सज्जता पूर्णत्वाला
By Admin | Updated: July 16, 2015 00:17 IST2015-07-16T00:13:10+5:302015-07-16T00:17:05+5:30
कपिलधारातीर्थावर आज ध्वजारोहण

सिंहस्थ कुंभमेळा : कावनईत सोहळ्याची सज्जता पूर्णत्वाला
घोटी : स्ािंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील कावनई येथे गुरुवारपासून सुरू होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी अकरा वाजता
श्री स्वरूप सांप्रदायाचे नरेंद्र महाराज व आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज यांच्या हस्ते व साधू-महंतांच्या उपस्थितीत होत असलेल्या ध्वजारोहण सोहळ्याने या कुंभमेळ्याच्या आरंभ होत आहे.
अनेक वर्षांपूर्वी नाशिक व त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा भरण्यापूर्वी धार्मिक वारसा लाभलेल्या कावनई येथे भरत असे. कालांतराने तो नाशिक व त्र्यंबकेश्वरला भरविण्यात येऊ लागला. कपील महामुनीचे वास्तव्य लाभलेल्या या पुण्यभूमित कुंभमेळा आयोजनाची परंपरा अबाधित ठेवण्यात आली आहे. या वर्षी होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
ध्वजारोहण समारंभाने कुंभमहापर्वाला आरंभ होत आहे. समारंभास श्री स्वरूप सांप्रदायचे जगतगुरु रामायणाचार्य नरेंद्र महाराज यांच्यासह अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज, रामायणाचार्य श्री. हंस देवाचार्य महाराज, मंगलपीठाश्वर महंत माधवचार्याजी महाराज, अखिल भारतीय पंच निर्वाणी अनी आखाड्याचे महंत जगन्नाथदास महाराज, अखिल भारतीय पंच निर्मोही अनी आखाड्याचे महंत आयोध्यादास महाराज, श्री. महंत राजेंद्रदास महाराज, चतु:संप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास महाराज, पंचमुखी हनुमानमंदिर आखाडा परिषदचे महंत भक्तिचरणदास महाराज यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, राजाभाऊ वाजे, सीमा हिरे, देवयानी फरांदे, बबनराव घोलप आदि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती महंत रामनारायणदास फलाहारी महाराज यांनी दिली.