सिंहस्थ पर्वणी : प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने दुमदुमले टाकेद
By Admin | Updated: October 26, 2015 22:54 IST2015-10-26T22:06:21+5:302015-10-26T22:54:32+5:30
वारकऱ्यांचे सर्वतीर्थावर शाहीस्नान

सिंहस्थ पर्वणी : प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने दुमदुमले टाकेद
नाशिक/सर्वतीर्थटाकेद/घोटी : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कोजागरी पौर्णिमेचा मुहूर्त साधत हजारो वारकऱ्यांनी सोमवारी (दि. २६) इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या नेतृत्वात शाहीस्नान करत पर्वणी साधली.
सर्वतीर्थावर त्र्यंबकेश्वर येथून आणलेल्या संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांचा मुखवटा व चरण पादुका, पंढरपूर येथून आणलेल्या नामदेव महाराजांच्या पादुका, पैठण येथून आणलेल्या एकनाथ महाराजांच्या पादुका, आळंदीहून आलेल्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या व जगत्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचे साधूमहंत व संत-माहात्म्यांनी पूजन केले. विशेष म्हणजे निवृत्तिनाथांची पालखी पंढरपूरनंतर केवळ टाकेद येथेच आणण्यात आली होती. प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार महेंद्र पवार आदि उपस्थित होते. कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर दिवसभरात जवळपास एक लाख भाविकांनी शाहीस्नान केल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे़ (लोकमत चमू)