डीजीपीनगरला उभारली सिग्नल यंत्रणा
By Admin | Updated: August 30, 2015 23:04 IST2015-08-30T23:03:29+5:302015-08-30T23:04:00+5:30
डीजीपीनगरला उभारली सिग्नल यंत्रणा

डीजीपीनगरला उभारली सिग्नल यंत्रणा
उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे सिग्नल यंत्रणेची नितांत गरज असताना मनपा प्रशासनाकडून डीजीपीनगर वळण रस्त्यावरील चौकात सिग्नल यंत्रणा उभारली जात असल्याने वाहनधारकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकात व द्वारका जवळील काठे गल्ली येथे वाहतुकीची कोंडी व वाढते अपघात लक्षात घेऊन मनपा प्रशासनाकडून काही वर्षांपूर्वी सिग्नल बसविण्यात आले होते. त्यानंतर नाशिकरोड ते नासर्डी पुलापर्यंत महामार्गाच्या दुतर्फा ठिकठिकाणी उपनगरे, कॉलन्या मोठ्या प्रमाणात वसल्या. काही वर्षांपूर्वी विजय-ममता जवळील अशोका मार्ग निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी वाढलेली वाहतूक लक्षात घेऊन विजय-ममता चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली.
उपनगर नाक्यावर खरी गरज
सध्याच्या स्थितीत नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहतुकीची कोंडी सातत्याने होत असते. याच ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. वास्तविक उपनगर नाका येथे खऱ्या अर्थाने सिग्नल यंत्रणेची गरज आहे. मात्र, मनपा प्रशासनाकडून डीजीपीनगर वळण रस्त्यावरील चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी खांब उभारण्यात आले आहे. या ठिकाणापासून विजय-ममता सिग्नल अंतर हे अवघे ४०० मीटर इतकेच आहे. जितकी उपनगर नाक्यावर वाहतुकीची कोंडी व अपघाताला आळा घालण्यासाठी सिग्नल यंत्रणेची गरज आहे तितकी गरज सद्यस्थितीत डीजीपीनगर वळण रस्त्यावर नाही. डीजीपीनगर वळण रस्त्यावर गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगविल्यास वाहतुकीच्या कोंडीला लगाम लागू शकतो. मात्र मनपा प्रशासनाच्या या अजब निर्णय व कारभारामुळे वाहनधारक, रहिवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)