साधुग्राममध्ये चोरट्यांचा आखाडा
By Admin | Updated: August 17, 2015 01:17 IST2015-08-17T01:17:23+5:302015-08-17T01:17:36+5:30
आरोप : वाहनांच्या काचा फोडून होतेय चोरी

साधुग्राममध्ये चोरट्यांचा आखाडा
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आलेल्या साधू-महंतांच्या उभ्या वाहनांच्या काचा फोडून रात्रीच्या वेळी रोकड, तसेच अन्य वस्तू चोरी जाण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. यामुळे तपोवनातील साधुग्राममध्ये चोरट्यांचा आखाडा तयार झाला असून, पोलीस प्रशासन सुस्त असल्याने येथील चोऱ्या कधी थांबणार? असा सवाल साधू-महंतांनी केला आहे.
साधुग्राममध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी आखाड्यांमध्ये लावलेल्या चारचाकी वाहनांच्या दरवाजाजवळच्या तसेच मागच्या काचा फोडून चोरटे वाहनात ठेवलेली रोकड, तसेच अन्य वस्तूंची चोरी करत आहेत. आतापर्यंत दोन ते तीन वाहनांच्या काचा फोडून जवळपास लाखो रुपयांची चोरी झाल्याचे निर्माेही आखाड्याचे महंत राजेंद्रदास व श्यामसुंदरदास यांनी सांगितले. साधुग्राम परिसरात जागोजागी कॅमेरे बसविलेले असले तरी चोऱ्या होण्याच्या घटना घडत असल्याने सध्या साधू-महंत त्रस्त झालेले आहेत. चोऱ्या वाढल्याची तक्रार करूनही पोलीस प्रशासन सुस्त असल्याने साधू-महंतांनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
निर्माेही आखाड्याच्या सामरिया धामचे महंत संगीत कृष्णलालजी यांच्या वाहनाची तसेच हैदराबाद खालशाच्या श्री महंतांच्या वाहनांच्याही काच फोडून चोरट्यांनी रोकड व अन्य वस्तू चोरून नेल्याचे राजेंद्रदास यांनी सांगितले. (वार्ताहर)