कपालेश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:01+5:302021-03-13T04:26:01+5:30
सकाळी कपालेश्वर मुख्य मंदिरात अमोल थिटे, वसंत धारणे, प्रमोद कुलकर्णी, ॲड.अविनाश गाडे यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर दुपारी माध्यान्ह ...

कपालेश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट
सकाळी कपालेश्वर मुख्य मंदिरात अमोल थिटे, वसंत धारणे, प्रमोद कुलकर्णी, ॲड.अविनाश गाडे यांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर दुपारी माध्यान्ह पूजन गुरव कुंदन जगताप, ओंकार जगताप, अतुल शेवाळे, साहेबराव गाडे, यांच्या उपस्थितीत करण्यात आले, तर संध्याकाळची पालखी पूजा सुहास वैद्य, दीक्षित प्रसाद जानदे, अजिंक्य प्रभू, अजित देशपांडे आणि मध्यरात्रीची महाशिवरात्रीची मुख्य पूजा अमोल थिटे, गोविंद थिटे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, शरद दीक्षित, दिनेश वैद्य आणि गुरवांच्या हस्ते झाली.
गंगाघाटावरील श्रीकपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मंदिरापासून अंदाजे एक किमीपर्यंत जमावबंदी लागू करून, मंदिराकडे येणारे सर्वच रस्ते बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आले. मुख्य मंदिराबाहेर जाळ्या उभारून तिन्ही प्रवेशद्वारांवर पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. मंदिर परिसरातील सर्व पूजा, साहित्यविक्री दुकाने बंद करण्यात आल्याने भाविकांना कपालेश्वरचे दर्शन घेता आले नाही.
दुपारी महादेवाचा पंचमुखी मुखवटा मंदिरात आणल्यानंतर विधिवत पूजन करण्यात येऊन मुखवट्याची मोजक्या गुरव पुजाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा मारून पालखी मिरवणूक पार पडली. दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने गजबजून निघणारा कपालेश्वर मंदिर व गंगाघाट परिसर यंदा प्रथमच भाविकांची गर्दी नसल्याने ओस पडल्याचे चित्र दिसून आले.
इन्फो====
भाविकांना लाइव्ह दर्शन
कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भाविकांना कपालेश्वर मंदिरात येण्यासाठी मनाई करण्यात आल्याने भाविकांना दर्शन घडावे यासाठी विश्वस्त मंडळातर्फे फेसबुक माध्यमातून लाइव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.