वसुली दाखवा... तरच पगार

By Admin | Updated: June 1, 2017 01:42 IST2017-06-01T01:41:55+5:302017-06-01T01:42:04+5:30

नाशिक : चालू महिन्याची वसुली पूर्ण केली नाही म्हणून महावितरणच्या नाशिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार रोखल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

Show the recovery ... then only salary | वसुली दाखवा... तरच पगार

वसुली दाखवा... तरच पगार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : चालू महिन्याची वसुली पूर्ण केली नाही म्हणून महावितरणच्या नाशिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार रोखल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. महसूल विभागाच्या बैठकीत स्वत:चे अपयश लपविण्यासाठी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जोपर्यंत वसुली पूर्ण होणार नाही, तोपर्यंत पगार देऊ नका, असा परस्पर शब्द दिल्याने कर्मचाऱ्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, वरिष्ठांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
नाशिक विभागात चालू महिन्याची थकबाकीची पूर्णत: वसुली झाली नसल्याने, महसूल विभागाच्या बैठकीत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात आली. अपयशाचे खापर आपल्यावर फोडले जाऊ नये, या भीतीने वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांचे मत विचारात न घेताच परस्पर ‘जोपर्यंत वसुली पूर्ण होत नाही, तोपर्यंत पगार देऊ नका’ असा शब्द देऊन टाकला. शिवाय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराची वरिष्ठ पातळीवर मागणीही केली नाही. त्यामुळे महिना संपूनदेखील कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा झाला नसल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
वास्तविक महिन्याच्या तीन दिवस अगोदरच म्हणजेच २८ किंवा २९ तारखेला कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या खात्यात जमा केले जातात. परंतु या महिन्यात पगारच झाला नसल्याच्या जेव्हा तक्रारी समोर आल्या तेव्हा वरिष्ठांचा हा प्रताप समोर आला. दरम्यान, पगार झाला नसल्याने कर्मचाऱ्यांचे मासिक बजेट कोलमडले आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच घराचे, एलआयसीचे हप्ते शिवाय इतर कर्जाचे हफ्ते जात असल्याने त्यावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, याविषयी महावितरणच्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना जाब विचारला असता त्यांनी आपण सन्मानाने पगार होऊ दिले नसल्याचे उत्तर दिले. मुख्य अभियत्यांचे हे उत्तर ऐकूण पदाधिकारीही अचंबित झाले असून, ‘सन्मान’चा नेमका अर्थ काय? असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे. यावेळी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय का घेतला गेला नाही? असा सवालही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

Web Title: Show the recovery ... then only salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.