साईनाथनगरला ४१ दुकाने जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:29 IST2019-01-18T23:56:03+5:302019-01-19T00:29:36+5:30
साईनाथनगर येथे खासगी जागेवर उभारण्यात आलेली ४१ दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली. अर्थात, बहुतांशी दुकानदारांनी आपले दुकानातील साहित्य अगोदरच काढून घेतले असल्याने महापालिकेला फारशी अडचण उद््भवली नाही.

साईनाथनगरला ४१ दुकाने जमीनदोस्त
नाशिक : साईनाथनगर येथे खासगी जागेवर उभारण्यात आलेली ४१ दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली. अर्थात, बहुतांशी दुकानदारांनी आपले दुकानातील साहित्य अगोदरच काढून घेतले असल्याने महापालिकेला फारशी अडचण उद््भवली नाही.
साईनाथ चौफुली लगत सर्व्हे नंबर ८६७/पै. या खासगी जागेत ही दुकाने होती. काही दुकाने फर्निचर, तर काही गॅरेज आणि कपडे अशा विविध व्यावसायिकांची होती. महापालिकेने २०१५-१६ मध्ये या व्यावसायिकांना नोटिसा दिल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
व्यावसायिकांनी मागितली जिल्हा न्यायालयात दाद
न्यायालयाने सदरची बेकायदेशीर बांधकामे नियमित करायची असेल तर नगररचना विभागाकडे अर्ज करण्यास सांगितले त्यानुसार संबंधितांनी अर्ज केले. मात्र प्रचलित नियमांना धरून ते नसल्याने नगररचना विभागाने सर्व प्रस्ताव नाकारले. त्यानंतर महापालिकेने गेल्यावर्षी जून महिन्यात संबंधितांना बांधकामे हटविण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली. दरम्यान, संबंधित व्यावसायिकांनी तातडीने पुन्हा जिल्हा न्यायालयात दाद मागितली. परंतु गुरुवारी (दि.१७) झालेल्या सुनावणीच्या वेळी त्यांना स्थगिती मिळाली नाही. हीच संधी साधत आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांनी तडक शुक्रवारी कारवाई केली.