लघुपटाद्वारे मांडली पाणीटंचाईची व्यथा
By Admin | Updated: July 4, 2017 23:43 IST2017-07-04T23:01:17+5:302017-07-04T23:43:06+5:30
सुरगाणा : तरुणाने पाणीटंचाईबाबत तयार केलेला लघुपट शासनदरबारी दखल न घेतल्याने संस्थेने सोडवून पाणीप्रश्न सोडवला.

लघुपटाद्वारे मांडली पाणीटंचाईची व्यथा
लोकमत न्यूज नेटवर्क
सुरगाणा : एका तरुणाने पाणीटंचाईबाबत तयार केलेला लघुपट शासनदरबारी दाखवूनही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर हा प्रश्न एका सामाजिक संस्थेने सोडवून तालुक्याच्या दुर्गम भागातील धामणकुंड या गावचा पाणीप्रश्न सोडवला आहे.
तालुक्यापासून दूर अंतरावर असलेल्या दुर्गम आदिवासी पाडा धामणकुंड येथे दरवर्षी पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली असायची. शासनाकडून लाखो रुपयांची नळपाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. पण ही योजनाच पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांच्या घशाला पडलेली कोरड बघून येथील देवीदास या उमद्या तरु णाने ‘पाणीटंचाईकडून समृद्धीकडे’ हा लघुपट शासनदरबारी अधिकाऱ्यांना दाखवला. अखेर त्यांनी सामाजिक संस्था सत्यसाई परिवार नाशिक यांच्याकडे धाव घेतली. या संस्थेने पाहणी करून गावातील पाणीटंचाईची खात्री करून घेतली. यावर मात करण्यासाठी मदतीचा हात पुढे करीत संस्थेने दूरवरच्या विहिरीतून गावात मोटारपंप बसवून पाइपलाइन करून दिली. जेथे लाखो रुपये खर्च करून पाणीटंचाई दूर होऊ शकली नाही तेथे एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन पाणीटंचाई दूर केल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरणात पसरले आहे.