दुकानात जबरदस्ती घुसून दुकानदारास शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:08 IST2018-03-26T00:08:27+5:302018-03-26T00:08:27+5:30
कुरापत काढून पाच संशयितांनी बळजबरीने दुकानात घुसून दुकानदारास शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) रात्रीच्या सुमारास मुक्तिधामजवळील कॉटन क्लब दुकानात घडली़ याप्रकरणी पाच संशयितांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दुकानात जबरदस्ती घुसून दुकानदारास शिवीगाळ
नाशिक : कुरापत काढून पाच संशयितांनी बळजबरीने दुकानात घुसून दुकानदारास शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) रात्रीच्या सुमारास मुक्तिधामजवळील कॉटन क्लब दुकानात घडली़ याप्रकरणी पाच संशयितांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तमंदिर परिसरातील सुशील सुराणा यांचे रेजिमेंटल प्लाझाजवळ कॉटन क्लब नावाचे दुकान आहे़ शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सुराणा यांनी दुकानाच्या समोर त्यांची गाडी पार्क केली होती़ याचा संशयित गिरीश मुदलीयार यास राग आल्याने त्याने कुरापत काढून सुराणा यांना शिवीगाळ व दमदाटी केली़ यानंतर रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास मुदलीयार याने आपले साथीदार कमल कलिया मूर्ती, विशाल कुलथे, महेंद्र अहिरे व श्रीकांत शाहीर यांना बोलावून घेत बळजबरीने दुकानात प्रवेश केला व आरडाओरड करून शिवीगाळ करून आमच्या नादी लागू नको असे म्हणून दमदाटी केली़ या प्रकरणी सुशील सुराणा यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात मुदलीयारसह पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, फिर्यादी सुराणा यांनी न्यायालयात संशयित व आपली चांगली ओळख असून, वाद शमल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. संशयितांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे वृत्त आहे़