भारनियमनाचा शेतीला फटका
By Admin | Updated: May 6, 2017 23:19 IST2017-05-06T23:19:08+5:302017-05-06T23:19:23+5:30
वणी : भारनियमनाव्यतिरिक्त आपत्कालीन भारनियमन वितरण कंपनीने सुरू केल्याने शेती उद्योगधंदे, पाणीपुरवठा योजना यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

भारनियमनाचा शेतीला फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : भारनियमनाव्यतिरिक्त आपत्कालीन भारनियमन वितरण कंपनीने सुरू केल्याने शेती उद्योगधंदे, पाणीपुरवठा योजना यावर प्रतिकूल परिणाम होत असून, वीजनिर्मितीसाठी आवश्यक पाणीसाठ्यात घट व कोळशाच्या टंचाईमुळे होणाऱ्या अडचणीचे कारण वितरण कंपनीने पुढे केले आहे.
एकलहरे विद्युत केंद्रातून ओझर-दिंडोरी-वणी-सुरगाणा असा वीजप्रवाह दिंडोरी व सुरगाणा तालुक्यात करण्यात येतो. दिंडोरी येथे १३२ केव्ही क्षमतेचे विद्युत केंद्र असून, वणी ३३ केव्ही, पिंप्री ३३ केव्ही, करंजखेड ३३ केव्ही, सुरगाणा ३३ केव्ही अशा क्षमतेच्या उपकेंद्रातून विद्युत पुरवठा करण्यात येतो. विजेची मागणी व पुरवठा यात समन्वय राहिला नसल्याने नाइलाजाने ग्रामीण भागात भारनियमन वितरण कंपनीला सुरू करावे लागले़ विद्युत निर्मितीसाठी आवश्यक जलसाठा व कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम होत असल्याने नाइलाजाने भारनियमन करावे लागत असल्याची वितरण कंपनीची भूमिका आहे. दरम्यान, दिवसेगाणिक शेती घरगुती व्यापारी औद्योगिक वीज ग्राहकाकडून वीजजोडणीची मागणी वाढली आहे. ग्राहकांची वाढणारी संख्या व वीजनिर्मिती यांचे समन्वयात्मक गणित जुळत नसल्याने आपत्कालीन भारनियमनाचे अस्र वितरण कंपनीने बाहेर काढले आहे. वीजग्राहकाचे समाधान करता करता वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांची दमछाक झाली असून, सद्यस्थिती पाहता आपत्कालीन भारनियमन शहरी भागात व ग्रामीण भागातील भारनियमनात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे.