बोगस कांदा बियाण्यांमुळे फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:43 IST2021-02-08T21:15:20+5:302021-02-09T00:43:26+5:30

पाळे खुर्द : कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरातील आसोली येथे उघडकीस आला आहे. अस्मानी संकटावर मात करत हात उसनवारी करत न्हाळी कांद्याची लागवड केली, परंतु बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी पंचायत समितीतील कृषी विभागाकडे तक्रार देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Shock due to bogus onion seeds | बोगस कांदा बियाण्यांमुळे फटका

बोगस कांदा बियाण्यांमुळे फटका

ठळक मुद्दे पाळे खुर्द : शेतकऱ्याचे १२ लाखांचे नुकसान, कृषी विभागाकडे तक्रार

कळवण तालुक्यातील आसोली येथील शेतकरी भीमराव वामन देवरे यांनी २१ सप्टेंबर २०२० रोजी उन्हाळी कांदा बियाणे खरेदी केले. दोन एकरमध्ये लागवड केलेल्या कांदे ८० टक्के टोंगळे व डिरले, पोकळ निघाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धुळे येथील एका बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रातून घेतलेल्या कांदा बियाणांची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी देवरे आर्थिक संकट सापडले आहेत. संपूर्ण उन्हाळी हंगाम वाया जाणार आहे. त्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्नच शून्य होणार आहे. त्यामुळे आगामी वर्षाचे त्यांचे उपजीविकेचे साधनच हिरावले गेले आहे. बियाणे खरेदी व शेती मशागतीसाठी नातेवाइकांकडून घेतलेले हात उसनवारीचे पैसे कसे फेडायचे, ही विवंचना त्यांना सतावत आहे. तसेच कळवण येथील एका केंद्रातून काही शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले होते. मात्र लागवड केल्यानंतर ६० ते ७० दिवसानंतर कांद्याच्या पातीला टोंगळे, डिरले निघाल्याने जमिनीत कांदाच तयार झाला नाही. त्यामुळे उत्पन्न निघणार नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी विभागाने तत्काळ पंचनामा करून शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करावा व बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. याबाबत तहसीलदार बी. ए. कापसे, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी राहुल आहेर यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
माझ्या शेतात २ दोन एकर बियाण्याची कांदा लागवड केली आहे. मात्र ६० दिवसानंतर कांद्याला टोंगळे व डीरले निघाल्याने माझे पूर्णतः कांदा पीक वाया गेले आहे. उत्पन्न दोन एकरमध्ये १२ ट्रॅक्टर निघाले असते. चारशे क्विंटल कांद्याचे उत्पन्न झाले असते. शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी.
- भीमराव देवरे, शेतकरी, आसोली
अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष
दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक पिकांचे बोगस बियाणे बाजारात विक्रीसाठी येत असतात. याबाबत शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर बोगस बियाणे निघाल्याचे कळताच कृषी विभागाकडे तक्रार केली जाते; मात्र या तक्रारीची कोणतीच दखल न घेता कृषी दुकानदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार होतो. म्हणून वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांचा आढावा घेऊन संबंधित कृषी बियाणे विक्री केंद्रांवर व दोषी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
शेतकऱ्याची तक्रार आली आहे. लवकरच कांदा बियाणे संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, बियाणे कंपनीचे मालक, विक्रेता, तालुका कृषी अधिकारी अशी टीम जाऊन पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
- राहुल आहेर, कृषी अधिकारी, पंचायत समिती

Web Title: Shock due to bogus onion seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.