तळवाडेत टॅँकर पोहचताच जल्लोष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 17:59 IST2019-05-19T17:58:52+5:302019-05-19T17:59:39+5:30
सायखेडा : तळवाडे येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, गावातील एकही विहीर, बोअरवेलला पाणी नसल्याने कोसभर दूर जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत होता हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने टँकर सुरु करण्याची मागणी अखेर मंजूर करण्यात आली. रविवारी दुपारी गावात टँकर आल्याने नागरिकांनी एकच जल्लोष केला, महिलांनी पाणी भरण्यासाठी एकच लगबग केली.

तळवाडेत टॅँकर पोहचताच जल्लोष !
निफाड तालुक्याच्या दक्षिण भागातील तळवाडे गावात दुष्काळ आहे. अनेक महिन्यांपासून गावकरी पाणीटंचाईचा सामना करत आहेत. सरपंच लता सांगळे यांनी गावात टँकर सुरु करण्यासाठी निफाड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात अनेक वेळा प्रस्ताव सादर केले, मात्र कधी आचारसंहिता तर कधी गावातील विहिरी अधिग्रहणाची कारणे देत चालढकल केली जात होती. गावातील विहिरी, बोअरवेल अधिग्रहण करूनही त्या आटल्यामुळे पाण्याच्या शोधात गावातील महिलांना कोसभर भटकंती करावी लागत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने या संदर्भात ग्राउंड रिपोर्टद्वारे रविवारी दखल घेतल्याने त्याच दिवशी गावात टँकर सुरु करण्यात आला. वर्षानुवर्षे दुष्काळ असलेल्या तळवाडे गावात यंदा दरवर्षीच्या तुलनेत दुष्काळाने भयानक रूप धारण केले आहे. यंदा अल्प पावसामुळे वर्षभर जमीन नापीक राहिली. विहिरींनी जानेवारी महिन्यात तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे गावात टँकर सुरु झाल्याने नागरिकांनी धन्यवाद दिले.