सहकाराच्या आखाड्यात तापले राजकारण तीन पॅनलची शक्यता, शिवसेना-मनसे एकत्र,
By Admin | Updated: February 25, 2015 00:37 IST2015-02-25T00:37:17+5:302015-02-25T00:37:56+5:30
सहकाराच्या आखाड्यात तापले राजकारण तीन पॅनलची शक्यता, शिवसेना-मनसे एकत्र

सहकाराच्या आखाड्यात तापले राजकारण तीन पॅनलची शक्यता, शिवसेना-मनसे एकत्र,
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार धुरिणांसह राजकीय मातब्बरांनी कंबर कसली असून, जिल्हा बॅँकेसाठी होणारी निवडणूक ही सहकाराबरोबरच राजकीय पातळीवर लढली जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत शिवसेना-मनसे यांच्यासह एक पॅनल, तर भाजपाचे स्वतंत्र पॅनल निर्मितीची चर्चा असून, दोन्ही पॅनलमध्ये जागा न मिळालेल्यांनी तिसऱ्या पॅनलची ऐनवेळी निर्मिती करण्याची तयारी केल्याने जिल्हा बॅँकेची निवडणूक चांगलीच गाजण्याची चिन्हे आहेत.जिल्हा बॅँकेचे माजी संचालक व माजी आमदार अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या निवासस्थानी यासंदर्भात काल (दि.२४) दुपारी एक अनौपचारिक बैठक झाल्याचे कळते. या बैठकीस शिवसेनेच्या एका विद्यमान आमदारासह जिल्हा बॅँकेच्या दोन्ही माजी संचालकांनी तसेच एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी हजेरी लावली. जिल्हा बॅँकेचेच माजी संचालक वसंत गिते नुकतेच भाजपावासी झालेले असल्याने यावेळी ते भाजपाच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची चर्चा आहे. या भाजपाच्या पॅनलचे नेतृत्व माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे, तर एकेकाळचे कोकाटे यांचे सहकारी माजी खासदार देवीदास पिंगळे हे राष्ट्रवादीत, तर कॉँग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल हे काँग्रेसमध्ये असल्याने या तिघांची एकत्र येण्याची शक्यता दुरावली आहे. तिकडे ओबीसी गटातून शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे इच्छुक असताना भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाणही भाजपानिर्मित पॅनलकडून आखाड्यात उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी सहकार व राजकीय क्षेत्रातील वातावरण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे.