Shiv Sena Suhas Kande : भुजबळ काका-पुतणे आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद सर्वश्रुत असून, रविवारी कांदे यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. नांदगाव मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणारे समीर भुजबळ यांना अजित पवार यांनी हुसकावले असतानाही ते त्यांच्या पुढे पुढे करत असल्याचा आरोप कांदे यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार होते. त्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळ पक्षाच्या कार्यक्रमासाठी सक्रिय झाल्याने माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण अजूनही राष्ट्रवादीतच असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारलेला नसल्याचा दावा भुजबळ यांनी केला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेत आमदार सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना पक्षाने हुसकावले असल्याचा दावा करत जोरदार टीका केली.
महायुतीच्या धोरणानुसार युतीच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तीनही पक्षांचे ठरलेले होते. समीर भुजबळ यांनी आपल्या नांदगाव मतदारसंघातून बंडखोरी करीत आपल्याविरुद्ध उमेदवारी केली होती. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाचा राजीनामा दिला होता. याबाबत आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी अजित पवारदेखील उपस्थित होते. पवार यांनी भुजबळ यांनी दिलेला राजीनामा स्वीकारलेला आहे. त्यांना ते पक्षात घेणारदेखील नाहीत, असा दावा कांदे यांनी समीर भुजबळ यांच्यावर टीका करताना केला.
'गद्दारी केल्यामुळेच मंत्रिपद नाही'सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली. भुजबळ जेथे जातात तेथे गद्दारी करतात. त्यामुळेच त्यांना अजितदादा पवार यांनी मंत्रिपद दिले नाही, असा आरोप कांदे यांनी केला. महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध समीर भुजबळ यांना रिंगणात उतरविल्याचा मुद्दा उपस्थित करत कांदे यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांनाही घेरले. छगन भुजबळ हे वयामुळे थकले आहेत, तर समीर भुजबळ पुढेपुढे करताहेत. त्यांची कीव येते अशी टीका केली,