Shiv Sena and BJP took to heart ... | नेतृत्व बदलाद्वारे महापालिका निवडणुकीच्या तयारीची नांदी !

सुधाकर बडगुजर

ठळक मुद्देशिवसेना व भाजपने घेतले मनावर... टार्गेट महापालिका, झेडपीचे काय?...पदरमोड करून पक्षासाठी काही करू शकण्याची बडगुजर यांची क्षमता वादातीत ठरावी. ​​​​​​​ महापालिका निवडणुकीचा बिगुल वर्षभराआधीच वाजून गेल्याचे म्हणता यावे.

सारांश

शिवसेनेच्या नाशिक महानगर-प्रमुखपदाचा खांदेपालट करताना महापालिकेच्या राजकारणाची व एकूणच तेथील सर्व स्थितीची सर्वार्थाने माहिती असणाऱ्या व्यक्तीकडे हा पदभार सोपविला गेल्याने यामागे आगामी निवडणुकांत महापालिकेवर भगवा फडकविण्याचे या पक्षाचे उद्दिष्ट स्पष्ट व्हावे. अर्थात एकीकडे हे होत असतानाच दुसरीकडे सत्ताधारी भाजपतील मार्गदर्शक नेतृत्वाचाही सांधेबद्दल घडून आल्याने महापालिका निवडणुकीचा बिगुल वर्षभराआधीच वाजून गेल्याचे म्हणता यावे.

वर्षभरावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सारेच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातून संबंधितांची सक्रियता वाढलेली दिसत आहे. पक्ष संघटनात्मक पातळीवर होऊ लागलेल्या फेरबदलांकडेही या निवडणुकीची तयारी म्हणूनच बघता यावे. महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्हीही पक्षांच्या पातळीवर सुस्तता असताना शिवसेनेने निवडणूक तयारीच्या दृष्टीने आघाडी घेतलेली दिसत आहे. मध्यंतरी म्हणजे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सचिन मराठे यांच्याकडे महानगरप्रमुखपद सोपविले गेले होते. प्रथमच कार्यक्षेत्राची विभागणी करीत त्यांच्या जोडीला महेश बडवे यांनाही महानगरप्रमुखपदाची धुरा सोपविली गेल्याने संघटनात्मक बांधणी आणखी घट्ट होईल, अशी अपेक्षा बाळगली जात होती; परंतु पुढील काळात तसे काहीही होताना दिसून आले नाही. पक्ष संघटना एकीकडे आणि महापालिका व जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी दुसरीकडे अशीच स्थिती राहिली.

सत्ताधारी पक्षाच्या म्हणून येणाऱ्या मर्यादा समजून घेता येणाऱ्या असल्या तरी, सरकारी आशीर्वादाचे सार्वजनिक उपक्रम किंवा त्यातील सहभागिताही दिसून येऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा महापालिकेतील सत्तेचे स्वप्न बघायचे तर सक्रियता व तेथील सत्ताधारी भाजप विरोधातील आक्रमकता शिवसेनेसाठी गरजेची बनली आहे. त्याचदृष्टीने महानगरप्रमुखपदी महापालिकेतील माहीतगार सुधाकर बडगुजर यांची नेमणूक केली गेली असावी. यात महापालिकेमध्ये या पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या अन्य नेत्यांना चपराक लगावतानाच निवडणुकीतील तिकीट वाटपाच्या दोर्‍या आपल्या हाती ठेवू पाहण्याची संपर्कप्रमुखांची राजकीय खेळी असेलही; पण पदरमोड करून पक्षासाठी काही करू शकण्याची बडगुजर यांची क्षमता वादातीत ठरावी.

विशेष म्हणजे बडगुजर यांची निवड घोषित होऊन दोन दिवस होत नाही तोच भाजपतील खांदेपालटही समोर येऊन गेला. राज्याचे माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे या पक्षाने नाशिक महानगराचे प्रभारी म्हणून जबाबदारी हस्तांतरित केली असून, उत्तर महाराष्ट्राच्या संघटन मंत्रिपदाची सूत्रेही रवि अनासपुरे यांच्याकडे सोपविली आहेत. हे तसे पूर्वीच झालेले असले तरी या दोघांनी अलीकडेच नाशकात बैठक घेऊन ओळख परेड घेतली व महापालिका निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे रणशिंग फुंकले. या नेतृत्व बदलामुळेच माजी आमदार व पक्षाचे शहराध्यक्ष राहिलेले बाळासाहेब सानप यांची घरवापसी होऊ घातली आहे. त्यामुळे भाजपची कमानही मजबूत होईल. बडगुजर व सानप दोन्हीही महापालिकेतील माहीतगार असल्याने त्यांच्या माध्यमातून सेना व भाजपतील सामना चुरशीचा ठरेल.

टार्गेट महापालिका, झेडपीचे काय?...
महापालिका निवडणुकीची तयारी होत असताना जिल्हा परिषदेबाबत मात्र कुणाची फारशी उत्सुकता दिसत नाही. कोरोनामुळे या दोन्ही संस्थांतील विद्यमान पदाधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले हे खरे; परंतु त्यापूर्वीचा आढावा घेता महापौर रंजना भानसी यांच्यापेक्षा जि.प.तील शीतल सांगळे यांच्या अध्यक्षपदाची कारकीर्द अधिक प्रभावी व उजवी ठरलेली दिसून येते. तेव्हा त्या बळावर व राज्यातील सत्तेच्या जोरावर शिवसेनेला जिल्हा परिषदेतील आपला ग्राफ वाढवायचीही संधी घेता यावी, पण त्याबाबत हालचाल होताना दिसू शकलेली नाही.

 

 

Web Title: Shiv Sena and BJP took to heart ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.