शिवसेना - भाजपाकडून ५१ नगरसेवक रिंगणात

By Admin | Updated: February 5, 2017 22:54 IST2017-02-05T22:54:10+5:302017-02-05T22:54:38+5:30

२९ आयारामांना संधी : पक्षाच्या २२ नगरसेवकांना उमेदवारी

Shiv Sena - 51 corporators from the BJP in the ring | शिवसेना - भाजपाकडून ५१ नगरसेवक रिंगणात

शिवसेना - भाजपाकडून ५१ नगरसेवक रिंगणात

नाशिक : महापालिका निवडणुकीत सेना-भाजपाकडून तब्बल ५१ विद्यमान नगरसेवक पुन्हा आपले नशीब आजमावणार आहेत. शिवसेनेने आपल्या १६, तर भाजपाने ६ नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे, तर अन्य पक्षांतून सेनेत दाखल झालेल्या १५, तर भाजपात दाखल झालेल्या १४ आयाराम नगरसेवकांना उमेदवारी करण्याची संधी देण्यात आली आहे. सेना-भाजपाकडून प्रत्यक्ष किती नगरसेवकांच्या गळ्यात पुन्हा विजयमाला पडेल, याबाबत आता उत्सुकता ताणून राहील. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. त्यानुसार दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. त्यात शिवसेना वा भाजपाने बव्हंशी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी बहाल केलेली आहे. त्यात भाजपाने विद्यमान नगरसेवक रंजना भानसी, दिनकर पाटील, प्रा. कुणाल वाघ, सुनंदा मोरे, संभाजी मोरुस्कर, सतीश कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे, तर फुलाबाई बोडके यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र कमलेश बोडके यांना, तर शालिनी पवार यांच्याऐवजी त्यांचे पती अरुण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सविता दलवाणी, सिंधू खोडे, परशराम वाघेरे व ज्योती गांगुर्डे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे खोडे वगळता अन्य तिघांनी अन्य पक्षांची उमेदवारी मिळविली आहे. भाजपाने मात्र अन्य पक्षातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करणाऱ्या उद्धव निमसे, रुची कुंभारकर, दामोदर मानकर, रेखा बेंडकुळे, शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, माधुरी जाधव, अर्चना थोरात, कन्हैया साळवे, संगीता गायकवाड, कोमल मेहरोलिया, दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे व सुदाम कोंबडे या आयारामांना उमेदवारी बहाल केली आहे. शिवसेनेने मनीषा हेकरे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सचिन मराठे, शैलेश ढगे, सूर्यकांत लवटे, नयना घोलप, केशव पोरजे, सुनीता कोठुळे, कल्पना पांडे, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, उत्तम दोंदे, शोभा फडोळ, डी. जी. सूर्यवंशी आणि वंदना बिरारी यांना पुन्हा संधी दिली आहे. विनायक पांडे यांनी घरातच चार तिकिटे मागितल्याने राडेबाजी होऊन त्याची दखल पक्षाने घेतली. त्यामुळे विनायक पांडे लढतीत नसतील. कोमल मेहरोलिया यांनी भाजपात प्रवेश केला आहे, तर शिवाजी सहाणे यांनी पुन्हा निवडणूक न लढविण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. शिवसेनेने यतिन वाघ, योगीता अहेर, नंदिनी जाधव, विजय ओहोळ, मंगला आढाव, रंजना बोराडे, अशोक सातभाई, रमेश धोंगडे, कल्पना चुंभळे, शीतल भामरे, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे, अरविंद शेळके, शेख रशीदा, संजय चव्हाण या पक्षबदलूंना उमेदवारी बहाल केली आहे. तब्बल ४१ टक्के नगरसेवक हे सेना-भाजपाकडून पुन्हा नशीब आजमावत आहे. त्यातील किती जणांच्या गळ्यात पुन्हा विजयमाला पडते, हे २३ फेबु्रवारीला समोर येईलच. (प्रतिनिधी)
भाजपाने एकूण २०, तर शिवसेनेने एकूण ३१ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. याशिवाय काही माजी नगरसेवकांनाही उमेदवारी बहाल करण्यात आलेली आहे. त्यामुळे  सेना-भाजपाला स्वबळावर अनेक नवीन चेहऱ्यांना निवडून आणण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. बहुमतासाठी आवश्यक ६२ आकडा स्वबळावर पार करण्यासाठी सेना-भाजपाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

Web Title: Shiv Sena - 51 corporators from the BJP in the ring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.