गोष्ट शिरवाडकरांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या पन्नाशीची...

By Admin | Updated: July 12, 2014 00:29 IST2014-07-11T23:26:08+5:302014-07-12T00:29:19+5:30

गोष्ट शिरवाडकरांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या पन्नाशीची...

Shirwadkar's meeting is about 50 | गोष्ट शिरवाडकरांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या पन्नाशीची...

गोष्ट शिरवाडकरांच्या संमेलनाध्यक्षपदाच्या पन्नाशीची...

धनंजय वाखारे ल्ल नाशिक
साल १९६४. मडगाव येथे भरणाऱ्या ४६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वि. वा. शिरवाडकर तथा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची बिनविरोध निवड झाली आणि मसापच्या अधिपत्याखाली झालेले हे संमेलन अखेरचे ठरले. त्यानंतर संमेलनाची सारी सूत्रे गेली ती साहित्य महामंडळाच्या हाती. मडगावच्या साहित्य संमेलनाला आता पन्नास वर्षे झाली आहेत. त्यामुळे यंदाचे साल तात्यासाहेबांच्याही संमेलनाध्यक्षपदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने छोटेखानी संमेलन आयोजित करून तात्यासाहेबांना मानवंदना द्यावी, असा एक सूर साहित्यवर्तुळातून व्यक्त होत आहे.
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबाबत तात्यासाहेबांनी कधी गांभीर्याने विचार केला नसल्याचे सांगितले जाते. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपल्या कनवटीला लागावे, ही प्रत्येक सारस्वताची महत्त्वाकांक्षा राहिलेली आहे. त्याला तात्यासाहेबही अपवाद नव्हते. भलेही तात्यासाहेबांनी कुणा सुहृदाच्या आग्रहाखातर संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुका लढविल्या असतील; पण तात्यासाहेबांनाही हा मुकुट परिधान करण्याचा मोह आवरलेला नव्हता. तात्यासाहेबांना १९६४ साली मडगावला झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बिनविरोध मिळाले खरे; परंतु त्यासाठी अगोदर तीनवेळा तात्यासाहेबांना संमेलनाध्यपदाने हुलकावणी दिली होती.
१९५८ मध्ये मालवण येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी वा. रा. ढवळे, वा. ल. कुलकर्णी, अनंत काणेकर आदिंनी तात्यासाहेबांना आग्रह करत उमेदवारी अर्ज भरण्यास भाग पाडले. त्यावेळी संमेलनाच्या आयोजनाचे अधिकार मसापकडे होते. मसापने प्राथमिक फेरीत आलेली तीन नावे निवडायची आणि नंतर निवडणुकीने एक नाव पक्के व्हायचे, अशी त्यावेळी पद्धत होती. मालवणच्या साहित्य संमेलनासाठी चिं. ग. कर्वे, कविवर्य अनिल आणि श्री. के. क्षीरसागर ही तीन नावे निवडली गेली आणि कुसुमाग्रजांचे नाव वगळले गेले. कविवर्य अनिलांच्या गळ्यात संमेलनाध्यक्षपदाची माळ पडली. तात्यासाहेबांना पहिल्यांदा अपयश पदरी पडले.
परंतु तात्यासाहेबांच्या मुंबईकर मित्रांनी आपला हट्ट सोडलेला नव्हता. १९५९ मध्ये मिरजला होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी त्यांनी तात्यासाहेबांची उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी घेऊन तो मसापकडे पाठविला. त्यावेळी श्री. के. क्षीरसागर, कविवर्य गिरीश आणि तात्यासाहेबांचे अर्ज आले. गिरीश हे वसंत कानेटकरांचे वडील. गिरीश यांचे ज्येष्ठत्व आणि त्यांची शेवटची निवडणूक असल्याने त्यांच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी तात्यासाहेबांनी गिरीशांना जाहीर पाठिंबा दिला. पण गिरीश निवडून आले नाहीत आणि क्षीरसागर मिरज संमेलनाचे अध्यक्ष बनले.
१९६२ मध्ये तात्यासाहेबांच्या मित्रांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी उचल खाल्ली. संमेलन साताऱ्याला होते आणि स्वागत समितीही कुसुमाग्रजांच्या नावाला अनुकूल होती. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री व पंजाबचे राज्यपालपद भूषविलेल्या काकासाहेब गाडगीळ विरुद्ध कुसुमाग्रज अशी लढत झाली. तात्यासाहेबांना पराभव पत्करावा लागला. सातारच्या पराभवाने निराश झालेल्या तात्यासाहेबांनी यापुढे निवडणुकीच्या भानगडीत पडायचे नाही, असा विचार केला. १९६४ मध्ये जेव्हा गोव्यातील मडगावला साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित झाले तेव्हा वा. रा. ढवळे यांनी तात्यासाहेबांना कोणत्याही स्थितीत बिनविरोध निवडून आणण्याचा निश्चय केला. मात्र, तात्यासाहेबांनी अर्ज भरण्यास नकार दर्शविला. यावेळी मित्रांनी वि. स. खांडेकरांना मध्यस्थी घातले. अंथरुणाला खिळून असलेल्या खांडेकरांनी वडीलकीच्या नात्याने कुसुमाग्रजांनी अध्यक्ष व्हावे, अशी इच्छा एका पत्रान्वये व्यक्त केली. खांडेकरांनीच इच्छा प्रदर्शित केल्यानंतर तात्यासाहेबांना अर्जावर स्वाक्षरी करणे भाग पडले आणि अध्यक्षपदाचे अन्य दोन उमेदवार महाराष्ट्र मासिकाचे संपादक पा. र. अंबिके व गं. बा. सरदार यांनी तात्यासाहेबांच्या भक्कम स्थितीचा अंदाज घेत उमेदवारी मागे घेतली. कुसुमाग्रज मडगावच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले.
मडगावचे साहित्य संमेलन हे मसापच्या नियोजनाखाली भरलेले शेवटचे संमेलन ठरले. त्यानंतरच्या संमेलनांची धुरा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आपल्या खांद्यावर घेतली. मडगावचे संमेलन तात्यासाहेबांच्या ठाम प्रतिपादनामुळे खूप गाजले. तात्यासाहेबांनी ‘गोवा हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग’ असल्याचे सांगितल्याने त्यांना विरोधही झाला. संमेलनाला महोत्सवी स्वरूप याच संमेलनापासून आले.
मडगावला तात्यासाहेबांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनाला आता पन्नास वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त संमेलनाध्यक्षपदाचा सुवर्णमहोत्सव एखाद्या छोटेखानी संमेलनाच्याच माध्यमातून साजरा करण्याचे औचित्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानपुढे आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या पन्नाशीनिमित्त तात्यासाहेबांच्या साहित्य संमेलनाबद्दल असलेल्या भूमिकेलाही उजाळा देता येऊ शकेल.

Web Title: Shirwadkar's meeting is about 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.