शरद पवार यांच्या उपस्थितीत ठरणार बाजार समित्यांची व्यूहरचना
By श्याम बागुल | Updated: April 7, 2023 16:41 IST2023-04-07T16:41:11+5:302023-04-07T16:41:45+5:30
आजपासून दोन दिवस तळ : राष्ट्रवादीच्या पॅनल निर्मितीवर चर्चा

शरद पवार यांच्या उपस्थितीत ठरणार बाजार समित्यांची व्यूहरचना
नाशिक - जिल्ह्यातील चौदा बाजार समित्यांसाठी नामांकन दाखल झालेले असताना या निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार नाशकात दाखल होत असून, या दौऱ्यात निवडणुकीची व्यूहरचना ठरणार आहे.
गेल्या आठवड्यातच अजित पवार यांनी बाजार समित्यांत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल उभे करण्याची केलेली सूचना पाहता पवार यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. शरद पवार यांचे शनिवारी दुपारी नाशकात पालघरहून हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. सायंकाळी नाशिकरोड प्रतिभूती मुद्रणालयाच्या हिंद मजदूर सभेच्या ७५ व्या वर्धापन दिनास पवार हजेरी लावतील त्यानंतर नाशकात मुक्कामी राहणार आहेत.
रविवारी (दि.९) नाशिक तालुक्यातील देवरगाव येथील आदिवासी आश्रमशाळा तसेच मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होईल. सायंकाळी शरद पवार पुण्याकडे रवाना होणार आहेत. गेल्या महिनाभरात शरद पवार यांचा दुसरा दौरा असून, आगामी काळात सहकारी संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने पवार यांच्या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.