शरद पवार : चालते-फिरते विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:40 IST2020-12-11T04:40:23+5:302020-12-11T04:40:23+5:30

माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, आदिवासींचे जीवनमान उंचावले पाहिजे, नोकरदार, व्यावसायिकांचे प्रश्न सुटले पाहिजे, अशी भावना ठेवत दीन-दलित, गोरगरीब ...

Sharad Pawar: A walking university | शरद पवार : चालते-फिरते विद्यापीठ

शरद पवार : चालते-फिरते विद्यापीठ

माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, आदिवासींचे जीवनमान उंचावले पाहिजे, नोकरदार, व्यावसायिकांचे प्रश्न सुटले पाहिजे, अशी भावना ठेवत दीन-दलित, गोरगरीब समाजातील प्रत्येक घटकाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहत आले आहेत. आदिवासींच्या कल्याणासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद त्यांनी केली. जेव्हा कधी त्यांची भेट होते तेव्हा शेती प्रश्नावर हमखास चर्चा होते अन‌् प्रश्न निश्चित सुटले जातात. राज्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येवो, साहेब सर्वप्रथम शेतकऱ्यांना धीर देतात, मदत मिळवून देतात. कांदा प्रश्नासाठी साहेब मनमाडहून तातडीने दिल्लीला जाऊन प्रश्न सोडविल्याचे अनेक प्रसंग आहेत. साहेब नेहमी शेतकऱ्यांसाठी धावून येत असल्याचे मी वारंवार बघितले आहे.

माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे निधन झाल्यावर साहेब अंत्यविधीला आले तेव्हा ते कृषिमंत्री होते. रस्त्याने जाताना खेडले परिसरात त्यांनी शेतकऱ्यांनी जमीन लेव्हल केलेली बघितली. रस्त्याच्या कडेला मोठमोठे दगड बघितले. गाडी थांबवायला सांगून त्यांनी पाहणी केली. डोंगर, टेकड्या, पडीक जमीन काही शेतकरी स्वखर्चाने सपाट करत आहेत; पण गरीब शेतकरी करू शकत नाही हे त्यांना कळले अन‌् त्यांनी तातडीने राष्ट्रीय बागवणी बोर्ड (एनएचबी) च्या अधिकाऱ्यांशी बोलून या भागात बोर्डच्या योजना राबविण्याच्या सूचना केल्या. नाशिकमध्ये सदर विभागाचे कार्यालय सुरू झाले अन‌् हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत माळरान सपाट करत बागा फुलवल्या. वेगवेगळ्या योजनांचा फायदा घेत पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज उभे केले, नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक लाभ मिळाला.

ऊस उत्पादक व कारखान्यांचे पवार साहेब नेहमीच तारणहार राहिले. उसाला जास्त पाणी लागते म्हणून ऊस शेती कमी व्हावी यासाठी अनेकांचे प्रयत्न झाले; मात्र शरद पवार हे सदैव ऊस उत्पादकांच्या पाठीशी राहिले. हमीभाव व नगदी पीक म्हणून ऊस क्षेत्र वाढले पाहिजे व उसामुळे कारखाने व त्यावर अनेकांचे रोजगार अवलंबून असल्याने ते नेहमीच हा उद्योग टिकला पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहेत. आजही साखरेला उठाव नसल्याने साखर कारखाने अडचणीत आहेत. या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ते सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.

पवार साहेबांना नाशिक जिल्ह्याने नेहमीच खंबीर साथ दिली असून, काँग्रेसमध्ये पुलोद आघाडी व आता राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच जिल्ह्यात चांगले यश मिळाले. मला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून संधी दिली. जिल्ह्यात मजबूत संघटन झाले. यश मिळाले. साहेबांनी अनेक वेळा कौतुकाची थाप दिली.

मी पवार साहेबांसोबत राहत नेहमी त्यांना साथ दिली. माझ्या कामाची पावती म्हणून त्यांनी मला पक्षाचे जिल्हाध्यक्ष केले व आता साखर संघावर उपाध्यक्ष म्हणून संधी दिली. मी जिल्हा परिषदेत असताना मला जि.प. अध्यक्ष करावे असा निरोप त्यांनी दिला. जि.प.त चर्चा झाली; पण मी दिंडोरी पंचायत समितीचा सभापती असल्याने मला ती संधी मिळाली नाही, तर विधान परिषदवर आमदार होण्याची चर्चा अनेक वेळा झाली; पण ती संधी मिळाली नाही. त्याची आपणास अजिबात खंत नाही. एकदा दिंडोरी दौऱ्यावर केंद्रीय कृषी सचिवांना हा माझा सच्चा कार्यकर्ता स्वतःसाठी कधी काही मागत नाही ही करून दिलेली ओळख माझ्यासाठी सर्वस्व आहे. साहेब सर्व समाजासाठी अहोरात्र झटत असून, पवार साहेबांचे ८० व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन!

- श्रीराम शेटे, माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Sharad Pawar: A walking university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.