धर्मसंस्कृतीवर श्रद्धा हाच यशाचा मार्ग : शंकराचार्य
By Admin | Updated: December 25, 2014 23:29 IST2014-12-25T22:52:59+5:302014-12-25T23:29:43+5:30
धर्मसंस्कृतीवर श्रद्धा हाच यशाचा मार्ग : शंकराचार्य

धर्मसंस्कृतीवर श्रद्धा हाच यशाचा मार्ग : शंकराचार्य
नाशिक : हिंदू धर्म संस्कृती ही वेदांवर आधारलेली असून, चारही वेद हे संपूर्णत: सत्यावर आधारीत आहे. धर्मसंस्कृती व वेदांमधील अध्यात्म समजून घेण्यासाठी श्रद्धा असणे गरजेचे आहे. सकारात्मक विचारातून व श्रद्धेतून खोलवर अभ्यास केल्यास यशाचा मार्ग सापडल्याशिवाय राहत नाही. धर्मसंस्कृतीने नेहमीच सर्व जिवांच्या संरक्षणाचा पुरस्कार केला आहे. प्राणिमात्रांचे कल्याण हे वेदातून होणार असल्याचे प्रतिपादन, करवीरपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्यानृसिंह भारती यांनी केले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समाजगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी शंकराचार्य प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, संस्थेचे अध्यक्ष अॅड. गणेश गोखले, कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी, अजित चिपळूणकर उपस्थित होते. दरम्यान, संतपरंपरा जोपासून कीर्तनातून उल्लेखनीय कार्य करणारे ह.भ.प अमृत महाराज, वैदिकक्षेत्रातील विवेक गोडबोले, विज्ञान क्षेत्रातील पंचागकर्ते दा. कृ. सोमण, सामाजिक क्षेत्रातील वसंत खरे, संगीत क्षेत्रामधील रोखा नाडगौडा, कलाक्षेत्रातील चित्रकार राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत यांना समाजगौरव पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम पाच हजार रुपये, मानपत्र सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप होते. (प्रतिनिधी)