नाशिक : नाशिक शहरात होणारा कुंभमेळा ‘हरितकुंभ’ होण्यासाठी काही धार्मिक संस्थाही पुढे सरसावल्या असून, शिवगोरक्ष योगपीठ व अखिल भारतीय वारकरी संप्रदायाच्या विद्यमाने सोमवारी (दि. २४) होणाऱ्या शाहीस्नान मिरवणुकीत ‘हरितकुंभ’ संदेश देण्यात येणार आहे.शोभायात्रेत दीड हजार भाविक टाळ, मृदुंग वाजवित सहभागी होणार आहे. याचबरोबर ‘हरितकुंभ’साठी आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्त्व लक्षात घेता ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा आशयाचे संदेश देणाऱ्या अभंगाचे पोस्टर भाविक हातात घेऊन सहभागी होणार आहेत. शोभायात्रेत शिवगोरक्ष योगपीठाचे परमहंस भगवान महाराज ठाकरे, शिवानंद महाराज, वारकरी संप्रदाय महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले (परभणी), जिल्हाध्यक्ष अण्णा महाराज अहेर उसवाडकर यांच्यासह हजार कीर्तनकार या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. ही शोभायात्रा के. के. वाघ महाविद्यालय येथून रामकुंडावर येणार आहे. रामकुंडावर गोदावरी मातेचे पाद्यपूजन करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता शिवगोरक्ष योगपीठात महाप्रसाद होणार आहे. (प्रतिनिधी)
वारकरी संप्रदायाचे उद्या शाहीस्नान
By admin | Updated: August 23, 2015 00:07 IST