नाशिकच्या शहाजहाँनी इदगाहमध्ये एकात्मतेसाठी 'दुवा'; हलक्या सरींच्या वर्षावात ईद ची नमाज अदा
By अझहर शेख | Updated: June 29, 2023 15:54 IST2023-06-29T15:54:11+5:302023-06-29T15:54:28+5:30
सोहळा शहाजहाँनी इदगाहमध्ये सकाळी पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला.

नाशिकच्या शहाजहाँनी इदगाहमध्ये एकात्मतेसाठी 'दुवा'; हलक्या सरींच्या वर्षावात ईद ची नमाज अदा
अझहर शेख, नाशिक : ए मेरे मौला, हमारे मुल्क ए भारत में अम्न-अमान कायम रख और भारत को तरक्की अता फरमा...अशी दुवा बकरी ईदच्या औचित्यावर सामूहिक नमाजनंतर शेकडो समाजबांधवांनी मागितली. गुरुवारी (दि.२९) शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वात सोहळा शहाजहाँनी इदगाहमध्ये सकाळी पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला.
त्याग, बलिदानाची शिकवण देणारी ईद-उल-अज़ा अर्थात बकरी ईद सालाबादप्रमाणे यंदाही गुरुवारी नाशिक शहर व परिसरात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. येथील ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानात पावसाच्या हलक्या सरींच्या वर्षावात नमाजपठण मुस्लीम बांधवांकडून पूर्ण करण्यात आले. सकाळी 9 वाजता सोहळा सुरू झाला. प्रारंभी मौलाना जफर व मौलाना महेबूब आलम यांनी बकरी ईद व कुर्बानीबाबत प्रवचनातून माहिती दिली. सकाळी साडे आठ वाजेपासून समाजबांधव मैदानात जमण्यास सुरुवात झाली. कोणी रेनकोट परिधान करून तर कोणी हातात छत्री घेत मैदानात येत होते. मैदानाकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पारंपरिक नवीन पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी पायात अशा पोशाखात नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारांभोवती मनपाकडून शुचिर्भूत (वजु) होण्यासाठी पाण्याचे नळ तात्पुरते बसविण्यात आले होते.
शुचिर्भूत झाल्यानंतर सोबत आणलेली चटई पसरवून त्यावर एका रांगेत सर्व स्थानपन्न झाले. दोन्ही धर्मगुरूंचे प्रवचन संपताच शहर ए खतीब यांनी उपस्थितांना ईद च्या नमाजपठणाची पद्धत समजावून सांगितली आणि सामूहिक नमाजला दहा वाजता प्रारंभ करण्यात आला.
विशेष दोन रकात नमाज अदा केल्यानंतर अरबी भाषेतून खतीब यांनी 'खुतबा' वाचला. यावेळी उपस्थितांनी एकाग्रतेने ते ऐकले. यानंतर संपुर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी व भारताच्या उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगतीकरिता दुवा करण्यात आली. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे सामूहिक पठनाने सोहळ्याची साडे दहा वाजता सांगता झाली. यानंतर उपस्थितांनी एकमेकांची गळाभेट घेत 'ईद मुबारक' म्हणत शुभेच्छा दिल्या.