सात शाखांना मंजुरी
By Admin | Updated: March 28, 2017 01:32 IST2017-03-28T01:32:02+5:302017-03-28T01:32:14+5:30
नाशिक : सिडकोत दी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बॅँक लि.च्या प्रादेशिक कार्यालयात बॅँकेची शाखा सुरू करण्यात आली

सात शाखांना मंजुरी
सुखदेवे : राज्य बॅँकेच्या नाशिक शाखेचा शुभारंभ
नाशिक : रिझर्व्ह बॅँकेचे बदललेले धोरण व स्पर्धेमुळे राज्य सहकारी बॅँकेच्या ठेवींमध्येही घट झाली असून, बॅँकिंग क्षेत्रातील चढ उतार लक्षात घेता, राज्य सहकारी बॅँकेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी चाळीस वर्षांनंतर बॅँकेच्या सात शाखांना रिझर्व्ह बॅँकेने मंजुरी दिली असून, नाशिकमध्ये सुरू झालेल्या बॅँकेच्या शाखेतून बदलत्या काळानुसार ग्राहकांना सर्व सुविधा देण्यात येतील, अशी माहिती राज्य सहकारी बॅँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी दिली. सिडकोत दी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बॅँक लि.च्या प्रादेशिक कार्यालयात बॅँकेची शाखा सुरू करण्यात आली. त्याचा शुभारंभ डॉ. सुखदेवे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल अहिरे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, विश्वास बॅँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आला त्यावेळी डॉ. सुखदेवे बोलत होते. ते पुढे म्हणाले, १०६ वर्षांची परंपरा असलेल्या राज्य सहकारी बॅँकेत २५ हजार कोटींच्या ठेवी होत्या, या ठेवींच्या माध्यमातून राज्य बॅँकेने राज्यातील सहकार चळवळीत मोठे योगदान दिले. साखर कारखाने, सूत गिरण्या, ग्रामीण बॅँका व सहकारी बॅँकांना राज्य बॅँकेने पत पुरवठा केला, त्याचबरोबर ठेवीही स्वीकारल्या. परंतु मधल्या काळात बदललेले नियम व धोरणामुळे राज्य बॅँकेच्या ठेवी थेट नऊ हजार कोटींवर पोहोचल्या. चढ-उतार सुरू असते, आता साडेपंधरा हजार कोटींच्या ठेवी झाल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, आमदार सीमा हिरे, डॉ. राहुल अहिरे, विश्वास ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ठाणे जिल्हा बॅँकेने शंभर कोटींच्या ठेवी राज्य बॅँकेत ठेवल्याने त्यांना ठेव पावतीचे वितरण करण्यात आले तसेच रायगड बॅँकेने ५० कोटी ठेवले. त्याचबरोबर गृह व वाहन कर्जाचे धनादेशही डॉ. सुखदेवे यांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)