दावा दाखलपूर्व प्रकरणांवर सामंजस्याने तोडगा
By Admin | Updated: April 8, 2015 01:45 IST2015-04-08T01:44:38+5:302015-04-08T01:45:03+5:30
दावा दाखलपूर्व प्रकरणांवर सामंजस्याने तोडगा

दावा दाखलपूर्व प्रकरणांवर सामंजस्याने तोडगा
नाशिक : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या शनिवारी (दि़११) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे़ यामध्ये दिवाणी, फौजदारी दावे, प्रलंबित प्रकरणे, दावा दाखलपूर्व प्रकरणांवर सामंजस्याने तोडगा काढला जाणार आहे़ न्यायालयातील वकील, पक्षकार यांनी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे यामध्ये ठेवावी, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांनी पत्रकार परिषदेत केले़ कारंजकर यांनी सांगितले की, न्यायालयांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली दाव्यांची संख्या, न्याय मिळण्यासाठी लागणारा प्रदीर्घ कालावधी त्यामध्ये दोन्ही पक्षकारांचा वेळेचा व पैशाचा होणारा अपव्यय यावर लोकअदालत हा प्रभावी उपाय ठरतो आहे़ न्यायालयीन वाद तडजोडीने मिटले जावेत यासाठी तीस वर्षांपासून न्यायालयांकडून प्रयत्न केले जाताहेत़ त्यासाठी लोकअदालत, मेडिएशनचाही वापर केला जातो आहे़ यासाठी विशेष करून न्यायाधीश व वकील या दोघांनाही प्रशिक्षण दिले जाते आहे़ न्यायालयातील दाव्यांमधील वादाचा मुद्दा अतिशय गौण असतो, यामध्ये वाद विकोपाला जाऊन वर्षानुवर्षे ही भांडणे सुरू असतात़ जिल्हा न्यायालयातील प्रलंबित दाव्यांची संख्या आजमितीस १ लाख ३६ हजार ६१३ इतकी आहे़ लोकअदालतीमध्ये दाव्याच्या निपटाऱ्याबरोबरच परस्परातील संबंध तसेच राहतात व शुल्कही भरावे लागत नाही़ तसेच यामध्ये दावा निकाली निघाल्यास कोर्ट फी स्टॅम्पची रक्कमही परत मिळते़ जानेवारी ते डिसेंबर २०१४ मध्ये झालेल्या लोकअदालतींमध्ये २८१४ प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी १४१९ दावे यशस्वीपणे निकाली काढण्यात आले़ जिल्हा न्यायालयात गतवर्षी १२ लोकअदालती झाल्या त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित ३१४७ प्रकरणे निकाली काढण्यात आले, तर २०१५ मध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत तीन लोकअदालत झाल्या़ त्यामध्ये २९६ दावे निकाली काढण्यात आल्याचे कारंजकर यांनी सांगितले़ यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड़जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड़ नितीन ठाकरे, जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)