नांदगाव येथे मका, तूर खरेदीसाठी केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:22 IST2020-02-22T23:17:25+5:302020-02-23T00:22:02+5:30
नांदगाव : सध्या मका व तूर या शेतमालाला केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने नांदगाव बाजार ...

नांदगाव येथे मका, तूर खरेदीसाठी केंद्र सुरू करा
नांदगाव : सध्या मका व तूर या शेतमालाला केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने नांदगाव बाजार समितीमध्ये फेडरेशनमार्फत सदर शेतमाल खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करावे, अशी मागणी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तेज कवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
नांदगाव बाजार समिती कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी मका विक्र ीअभावी शेतकरीवर्गाकडे पडून आहे. मक्याची इतिहासात प्रथमच आवक कमी झालेली असतानासुद्धा बाजारभावात कमालीची घसरण झालेली आहे. कोरोना व्हायरसमुळे पोल्ट्री उद्योगावर मोठा परिणाम झाल्याने व काही प्रमाणात मका केंद्र सरकारने आयात केल्याने बाजारभावात घसरण झाल्याचे सांगण्यात येते. त्यातच उन्हाळ मका उत्पादनही मोठ्या प्रमाणात येणार असल्याने बाजारभावात पुन्हा घसरण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने फेडरेशनमार्फत मका व तूर शेतमालाचे हमीभाव केंद्र सुरू करून शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा. शेतकरी याबाबत बाजार समितीकडे मोठ्या प्रमाणात मागणी करत असले बाबत सभापती तेज कवडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याबाबत शासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांना बाजार समितीमार्फत लेखी पत्रव्यवहार केल्याची माहिती सचिव अमोल खैरनार यांनी दिली.
बाजारभावात घसरण
सध्या ७०० ते १४५० रुपये दराने विक्र ी होत आहे. त्यात आणखी घसरण होणार असल्याने शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे. तसेच तूर शेतमालाचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन असून, बाजारभावात मोठी घसरण झालेली आहे. याकरिता शासनाने हमीभाव केंद्र सुरू करावे. त्यामुळे शेतकरीवर्गाचे होणारे आर्थिक नुकसान टळणार असून, शेतकरीवर्गाला दिलासा मिळणार आहे.