बचतगटातर्फे दारूबंदीचा ठराव संमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:01 IST2020-07-21T21:37:49+5:302020-07-22T01:01:44+5:30
पेठ : व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेली तरुण पिढी आणि सामान्य कुटुंबांची होणारी नासाडी यावर उपाययोजना करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत महिला बचतगटाच्या माध्यमातून दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे.

बचतगटातर्फे दारूबंदीचा ठराव संमत
पेठ : व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेली तरुण पिढी आणि सामान्य कुटुंबांची होणारी नासाडी यावर उपाययोजना करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत महिला बचतगटाच्या माध्यमातून दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे. पेठ तालुक्यातील खिरकडे येथील महिला पोलीसपाटील अश्विनी नाठे यांच्या संकल्पनेतून मैत्री सेवा महिला बचतगटाच्या सदस्यांनी गावात बैठक घेऊन दारूबंदीबाबत ठराव संमत केला.
ग्रामीण भागात व्यसनाचे प्रमाण वाढल्याने संसाराची दुर्दशा झाल्याच्या अनेक घटना घडत असून, यातून तरुण पिढीला सावरण्यासाठी गावात दारू तयार करणे अथवा पिण्यास पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच सध्या कोरोना संसर्गामुळे नागरिकांनी विनाकारण गावाबाहेर न जाता शासकीय नियमांचे पालन करून स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. दारूबंदीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीतही सर्व महिला सदस्यांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर केला. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, महिला बचतगटाच्या अध्यक्ष व महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.