शहरात विनापरवाना धावणाऱ्या २९५ रिक्षा जप्त
By Admin | Updated: March 18, 2017 21:59 IST2017-03-18T21:59:03+5:302017-03-18T21:59:03+5:30
शहरात बेशिस्त व विनापरवाना धावणाऱ्या रिक्षांवर शहर वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई
शहरात विनापरवाना धावणाऱ्या २९५ रिक्षा जप्त
नाशिक : शहरात बेशिस्त व विनापरवाना धावणाऱ्या रिक्षांवर शहर वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे़ शनिवारी (दि़१८) शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत २९५ रिक्षा जमा करण्यात आल्या असून, ६० हजार २०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे़
शहरातील सहाही विभागांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे दोन अधिकारी, शहर वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ही मोहीम राबविली जात असून, ज्या रिक्षाचालकांकडे परवाना, फिटनेस, लायसन्स, गणवेश नसेल अशांवर कारवाई केली जाते आहे़ पोलिसांनी १४५ रिक्षाचालकांवर गणवेश परिधान केला नसल्याने कारवाई केली असून, दंडापोटी ६० हजार २०० रुपयांची दंडवसुली केली आहे़ तसेच ज्या रिक्षाचालकांकडे परवाना वा कागदपत्रे नाहीत अशा रिक्षावर मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत़
या विशेष मोहिमेअंतर्गत बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध शहर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे़