संधीच्या शोधातील भटके !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:48 IST2017-08-20T00:44:02+5:302017-08-20T00:48:05+5:30
जहाज बुडण्यापूर्वी उंदरांनी उड्या मारणे हा झाला सामान्य शिरस्ता. राजकारणात गलबत पकडण्यासाठी इकडून-तिकडे उड्या घेतल्या जातात. संधीची अपेक्षा हेच एकमेव कारण किंवा आडाखा त्यामागे असतो. नसता पक्षकार्यासाठी कोण निष्ठा बदलेल? इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले यांच्या पक्षबदलाकडे त्याच दृष्टीने पाहता यावे.

संधीच्या शोधातील भटके !
जहाज बुडण्यापूर्वी उंदरांनी उड्या मारणे हा झाला सामान्य शिरस्ता. राजकारणात गलबत पकडण्यासाठी इकडून-तिकडे उड्या घेतल्या जातात. संधीची अपेक्षा हेच एकमेव कारण किंवा आडाखा त्यामागे असतो. नसता पक्षकार्यासाठी कोण निष्ठा बदलेल? इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले यांच्या पक्षबदलाकडे त्याच दृष्टीने पाहता यावे. मुंबईतील बोरिवली येथे नुकत्याच झालेल्या भाजपा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीप्रसंगी झोले व त्यांच्या काही समर्थकांनी हाती ‘कमळ’ धरले. विधानसभा निवडणुकीला अजून दीड-दोन वर्षाचा अवकाश असला तरी हे कमळप्रेम त्या अनुषंगानेच आले आहे याबाबत शंका बाळगता येऊ नये. झोले हे शिवसेनेतून भाजपात गेले आहेत कारण, शिवसेनेत माजी आमदार काशीनाथ मेंगाळ आले आहेत. मेंगाळ भाजपातून सेनेत आल्याने तेथे उमेदवारीची स्पर्धा नको म्हणून झोले यांनी सुरक्षित स्थळी प्रवास केला आहे. अर्थात, हल्ली अशी सुरक्षितता कुणी, कुणालाही देऊ शकत नाही हा भाग वेगळा. परंतु शिवसेनेच्या तुलनेत आजघडीला तेथे परिचित चेहरा नाही म्हणून झोले यांनी भाजपा गाठली. झोले तसे मातब्बर. शिवाय बहुपक्षीय पाणी चाखून झालेले. जनता पक्ष, समाजवादी काँग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या सर्वांचे उंबरे ओलांडून झालेले. काँग्रेसमध्ये असताना आमदार राहिलेले व राष्ट्रवादीत असताना आदिवासी विकास महामंडळात दीर्घकाळ संचालक राहिलेले. त्यामुळे जनसंपर्क अफाट. या ज्येष्ठत्वाच्या बळावरच त्यांना आणखी एकदा विधानसभा गाठायची आहे. गेल्यावेळी शिवसेनेकडून लढूनही ती त्यांना गाठता आली नव्हती म्हणून यंदा वाºयाची दिशा पाहून ते भाजपाच्या तंबूत शिरले इतकेच. भाजपाचेही एक बरे असते. येईल त्या साºयांना सामावून घेण्याची त्यांची तयारी असते. कुणाची पाटी किती घासून गुळगुळीत झाली, याचा आज विचार करण्यापेक्षा जनाधार वाढवत ठेवणे इतकेच त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे झोले यांनी यंदाच्या ‘सीजन’ची सुरुवात करून दिली म्हणायचे. तालुक्यात काँग्रेसच्या निर्मला गावित यांनी दुसºयांदा आमदारकी राखली असली तरी इगतपुरी नगरपालिकेसह पंचायत समिती व अधिकतर ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. जिल्हा परिषदेचे तीन गटही शिवसेनेकडेच आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेशी टक्कर घ्यायची तर भाजपाला परिचित व प्रभाव असलेले चेहरे हवेच होते. निवडणुकीतील उमेदवारीचा निर्णय होईल तेव्हा होईल, त्याला अजून वेळ आहे. परंतु तोपर्यंत तालुक्यात पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने ही आवक उपयोगी ठरण्याची पक्षाला अपेक्षा आहे. पण ती पूर्ण होईल याची शाश्वती देता येऊ नये. कारण झोले यांनी आतापर्यंत जे जे पक्ष बदलले, त्या त्या पक्षांना म्हणून त्यांच्यामुळे फारसा काही लाभ झाल्याचे दिसू शकलेले नाही. स्वत:साठी संधीच्या शोधात भटकणाºयांकडून तशा अपेक्षाही करायच्या नसतात. अशी माणसे येतात, आपला लाभ करून घेतात. तो न झाल्यास राजकीय घरोबे बदलतात, हा यासंदर्भातील सर्वच पक्षांचा अनुभव आहे. पक्ष वाढवून आपण अडगळीत जाण्यापेक्षा आपण वाढून पक्ष आपल्या काखोटीला बांधणे अधिक श्रेयस्कर, अशीच विचारधारा आज अंगीकारली जाताना दिसते. झोले यांच्याकडूनही यापेक्षा वेगळे काही होणे नाही.