विंचुरदळवी शिवारात आठ दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 17:27 IST2020-01-15T17:26:53+5:302020-01-15T17:27:46+5:30
विंचुरदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरदळवी शिवारात आठ दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दारणाकाठी भागात बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उसाच्या शेतात वनविभागाच्या पिंज-यात बिबट्या अडकला असून त्याची रवानगी मोहदरी वनोउद्यानात करण्यात आली आहे.

विंचुरदळवी शिवारात आठ दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद
दहा दिवसांपासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढला होता. त्यामुळे शेतकरी वर्ग शेतीच्या कामाला जाण्यास धजावत नव्हता. ग्रामस्थांच्या मागणीनतंर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दारणाकाठी रमेश एकनाथ कानडे यांच्या मालकीच्या उसाच्या शेत गट नंबर ६२८ मध्ये पिंजरा लावण्यात आला होता. आठ दिवसांपासून नर बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. मात्र या भागात दोन बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे पहिला बिबट्या जेरबंद केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. बुधवारी पहाटे या पिंज-यात बिबट्याची मादी जेरबंद झाली. पहाटे बिबट्यांच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणून गेला होता. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी. के. आगळे, वनरक्षक कैलास सदगीर, बाबूराव सदगीर यांच्यासह कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट्याची वनउद्यानात रवानगी करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचा-यांना पिंजरा शेताबाहेर काढण्यासाठी मदत केली.