नाशिक :त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या दुगारवाडी धबधबा येथे फिरण्यासाठी आलेल्या औरंगाबादच्या एका कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी अनुषा गोरांतला (२१,) उप्पाला कोट्टी रेड्डी (२०), रिम्मालापुडी रघुवंशी (२१) हे तीघे मित्र आपल्या अन्य तीन मित्र-मैत्रिणीसह सहलीसाठी आले होते. धबधब्याखाली डोहाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मंगळवारी (दि.१७) संध्याकाळी तीघे बुडाले. यापैकी अनुशा, उप्पाला या दोघांचे मृतदेह बुधवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले; मात्र बेपत्ता झालेल्या रघुवंशीचा मृतदेह अद्याप हाती लागला नसून गुरूवारी (दि.१९) दुपारी १२ वाजेपासून पुन्हा शोधकार्य राबविले जात आहे.
सायंकाळ होऊन अंधार पडू लागल्याने काव्या, कैपू, काव्या, आकाश हे तीघे दुचाकीवरून पुन्हा गंगापुर-गोवर्धन येथील एका विनियार्डमध्ये मुक्कामी आले. रात्री पुन्हा यांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क मोबाईलवर केला; मात्र संपर्क होत नसल्याने हे तीघेही घाबरले. त्यामुळे या तीघांनी रात्री पुन्हा दुगारवाडी गाठण्याचा निर्णय घेतला. जवळपासच्या नागरिकांची मदत घेत या तीघांनी त्यांच्या डोंगर उतरून धबधब्याजवळ गेलेल्या मित्र-मैत्रिणीचा शोध सुरू केला; मात्र येथे काळाकुट्ट अंधार, रातकिड्यांची किरकिर ऐकू येत असल्याने गावकऱ्यांनी त्यांना सकाळीच शोध घेऊ असे सांगून काढून दिले. कारण या भागात वन्यजीवांचाही वावर आहे.
बुधवारी हे तीघे सकाळी पुन्हा धबधब्याजवळ पोहचले. गावक-यांच्या मदतीने शोध सुरू केला असता त्यांना काही अंतरावर तुटलेली चप्पल आणि दगडावर ठेवलेले मोबाइल सापडून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ गावकºयांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती दिली. दुपारी अडीच वाजता वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे चांदोरी बचाव पथकाला मृतदेह काढण्यासाठी तसेच बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. ‘वैनतेय’ व चांदोरीचे सागर गडाख यांचे बचाव पथक सुमारे मागील सहा ते सात तासांपासून राबत अनुषा, उप्पाला या युवकाचा मृतदेह शोधून बाहेर काढला. अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, तहसिलदार दिपक गिरासे, सहायक निरिक्षक रामचंद्र कर्पे हे घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी रात्री नऊ वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू होती; मात्र अंधार आणि वन्यजीवांसह सर्पांचा वावर असल्यामुळे वालावलकर यांनी शोधमोहीम थांबविण्याचे आदेश देत गुरूवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्याच्या सूचना केल्या.