शोध बेपत्ता युवकाचा; मृतदेह आढळला बालकाचा
By Admin | Updated: September 1, 2015 23:39 IST2015-09-01T23:38:25+5:302015-09-01T23:39:10+5:30
गूढ वाढले : वनीकरणात दफन केलेला मृतदेह उकरला

शोध बेपत्ता युवकाचा; मृतदेह आढळला बालकाचा
सिन्नर : तालुक्यातील गुळवंच येथील बेपत्ता झालेल्या युवकाची दुचाकी सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील सामाजिक वनीकरणात बेवारस स्थितीत आढळून आली. दुचाकीपासून जवळच दफनविधी आढळून आल्यामुळे पोलीस व नातेवाइकांना संशय आला. त्यामुळे दफनविधीची जागा तहसीलदारांच्या परवानगीने उकरण्यात आली. त्यात सुमारे वर्षभराच्या बालकाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे पोलिसांना बेपत्ता युवकाचा शोध घेण्यासह मृत बालकाचे गूढ उकलण्याचे काम वाढले आहे.
गुळवंच येथील सोपान मारुती सानप (२६) हा युवक शनिवारी (दि. २९) रक्षाबंधनाच्या दिवशी पॅशन प्रो (क्र. एमएच १५ डीए ४९४५) मोटारसायकलने आईला मामाकडे पोहचविण्यासाठी खोपडी येथे गेला होता. आईला पोहचविल्यानंतर सिन्नरला जाऊन येतो, असे सांगून तो दुचाकीने सिन्नरकडे निघाला व त्यानंतर तो बेपत्ता झाला. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.
सोमवारी सायंकाळी सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या कडेला असलेल्या सामाजिक वनीकरण खात्याच्या जागेत बेपत्ता झालेल्या सानप याची दुचाकी बेवारस स्थितीत आढळल्याची खबर मुसळगावच्या पोलीसपाटलांनी सिन्नर पोलिसांनी दिली होती. बेवारस दुचाकीपासून जवळच अंतरावर खड्डा खोदून दफनविधी केल्याचे दिसून येत होते. सोमवारी सायंकाळी नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सदर जागेवर उदबत्ती व फुले आढळून आल्यामुळे तेथे दफनविधी झाल्याचे दिसून येत होते. परिसरातील गावातील कोणाचा याठिकाणी दफनविधी झाला आहे का, याची माहिती घेतल्यानंतर परिसरात कोणीही मृत झाल्याचे तपासात निष्पन्न झाले नाही. तोपर्यंत अंधार झाला होता.
बेपत्ता युवकाचा शोध सुरू असताना त्याठिकाणी बालकाचा मृतदेह आढळून आल्याने सर्वांना धक्का बसला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून सदर बालकाचा मृत्यू कशाने झाला हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच समजणार आहे. शवविच्छेदनानंतर मृत बालकाचा मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात बालकाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार निकम, नितीन मंडलिक अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
नातेवाईक व पोलिसांना संशय आल्याने सदर दफनविधीची जागा उकरण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी नायब तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, पोलीसपाटील व बेपत्ता युवकाच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत सदर जागा उकरण्यात आली. त्या ठिकाणी मृत झालेल्या एकवर्षीय बालकाचा नवीन कपडे घातलेला व शालीमध्ये गुंडाळलेला मृतदेह आढळून आला.