पराभूत नगरसेवकांच्या विकासनिधीला कात्री
By Admin | Updated: June 14, 2017 00:33 IST2017-06-14T00:32:15+5:302017-06-14T00:33:25+5:30
महापौरांचे संकेत : ७५ लाखांच्या निधीसाठी जुळवाजुळव

पराभूत नगरसेवकांच्या विकासनिधीला कात्री
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेची आर्थिक परिस्थिती दोलायमान असतानाही महापौर रंजना भानसी यांनी प्रत्येक नगरसेवकासाठी ७५ लाख रुपयांचा विकासनिधी घोषित केल्यानंतर आता निधीची जुळवाजुळव सुरू झाली असून, पराभूत झालेल्या तब्बल ४२ माजी नगरसेवकांच्या विकासनिधीला कात्री लावण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांमध्ये संघर्ष उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी १४१० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीला सादर केले होते. स्थायी समितीने त्यात ३८९ कोटी रुपयांची भर घालत नगरसेवकांसाठी प्रत्येकी ४० लाख रुपयांचा विकासनिधी प्रस्तावित केला होता. त्यात महापौरांनी आणखी ३५ लाख रुपयांची भर घालत विकास निधी थेट ७५ लाखांवर नेऊन पोहोचविला. महापालिकेची एकूणच आर्थिक स्थिती व जीएसटी अंतर्गत येणारे अनुदान याबाबत संभ्रमावस्था असताना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याविषयी प्रशासन साशंक आहे.
आयुक्तांनी अद्याप या निधीबाबत उघडपणे आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे महापौरांनी सर्व नगरसेवकांची आयुक्तांसमवेत बैठक घेण्याचे निश्चित केले आहे. महापौर रंजना भानसी यांनी कोणत्याही स्थितीत नगरसेवकांना ७५ लाख रुपयांचा निधी मिळवून देण्याचा विडा उचलला आहे, तर प्रशासनाकडून जमा व खर्चाची बाजू समोर केली जात आहे.