महिरावणीत बिबट्याचा धुमाकूळ
By Admin | Updated: November 24, 2015 22:16 IST2015-11-24T22:15:51+5:302015-11-24T22:16:28+5:30
घबराट : वारंवार दर्शन देऊन वासरू व घोड्यावर केला हल्ला

महिरावणीत बिबट्याचा धुमाकूळ
सातपूर : महिरावणी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून एकाच रात्री वासरू व घोड्यावर हल्ला चढविला. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.
महिरावणी शिवारातील लोणे वस्तीवर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अशोक शिवराम लोणे यांच्या घराबाहेरील गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला चढविला. वासराच्या आवाजाने घरातील माणसे बाहेर आली असता, बिबट्या वासरूला घेऊन चालला होता. नागरिकांच्या आरडा ओरडीने बिबट्याने वासरू सोडून पळ काढला. यात वासरू गंभीर जखमी झाले आहे. याच रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सुधाकर विष्णू लोणे यांच्या घोड्यावर बिबट्याने हल्ला चढविला. घोड्याने हा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. घोड्याच्या किंकाळीमुळे परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी बिबट्याला पळवून लावले. बिबट्याने एकाच रात्री
वासरू व घोड्यावर हल्ला केला.
परिसरात अनेक वेळा बिबट्याचे वास्तव्य असल्याचे आढळून आले
आहे. परिसरातून या आधी एक बिबट्या जेरबंद करण्यात आला
आहे. सदर घटनेची माहिती रमेश खांडबहाले यांनी वन विभागाला दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. या घटनेने भीतीचे वातावरण असून, महिला व पुरुष शेतीकाम करण्यास जाण्यासाठी घाबरत
आहेत. (वार्ताहर)