सिंहस्थ कामांच्या तीन प्रस्तावांना कात्री
By Admin | Updated: February 12, 2015 00:49 IST2015-02-12T00:20:55+5:302015-02-12T00:49:48+5:30
स्थायी समितीचा निर्णय : गंगापूररोडवरील मलनि:सारण केंद्र, शाही मार्ग रुंदीकरण बारगळले

सिंहस्थ कामांच्या तीन प्रस्तावांना कात्री
नाशिक : सिंहस्थ कामांतर्गत गंगापूररोडवरील मलनि:सारण केंद्रासह पारंपरिक शाही मार्ग आणि मालेगाव स्टॅण्ड ते सरदार चौक या मार्गाच्या रुंदीकरण प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने कात्री लावत सदर कामांच्या भूसंपादनासाठी जिल्हा भूसंपादन कार्यालयाकडे यापूर्वीच अदा करण्यात आलेली १७ कोटी ६६ लाखांची रक्कम अन्य कामांसाठी वर्ग करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, समितीने सिंहस्थविषयक अन्य सात कामांसाठी सुमारे ३७ कोटी ५५ लाखांची रक्कम मात्र वर्ग करण्यास संमती दर्शविली आहे.
महापालिकेने जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या विविध भूसंपादनाच्या प्रस्तावांमधील ६५ भूसंपादनांचे प्रस्ताव नवीन भूसंपादन कायदा लागू झाल्याने रद्द ठरविण्यात आल्याने भूसंपादनांसाठी अनामत म्हणून भरलेली ५५ कोटी २२ लाख रुपयांची रक्कम सिंहस्थातील अन्य कामांच्या भूसंपादनाकरिता वर्ग करण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला.
यावेळी राहुल दिवे यांनी स्थायी समितीने यापूर्वीच गंगापूररोडवरील मलनि:सारण केंद्र आणि पारंपरिक शाही मार्गाच्या १२ मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच फेटाळून लावला आहे. गंगापूररोडवरील मलनिस्सारण केंद्रासाठी प्रस्तावित जागा ही खड्ड्यात असून, ती उपयुक्त ठरणार नसल्याचे आयुक्तांनीही मान्य केले आहे. याशिवाय मालेगाव स्टॅण्ड ते सरदार चौक या मार्गाच्या रुंदीकरणाचाही प्रस्ताव मान्य करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सदर तीनही प्रस्ताव वगळण्यात येऊन अन्य सात कामांच्या प्रस्तावांसाठी सदर निधी वर्ग करण्याची सूचना केली. शिवाजी गांगुर्डे, प्रा. कुणाल वाघ यांनीही सदर तीनही प्रस्ताव वगळण्यात यावे, असे स्पष्ट केले. त्यानुसार सभापती राहुल ढिकले यांनी तीनही प्रस्ताव फेटाळून लावत त्यासाठी देण्यात आलेली १७ कोटी ६६ लाखांची रक्कम वर्ग करण्यास नकार दिला.
महापालिकेने गंगापूररोडवरील मलनिस्सारण केंद्रासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे ६ कोटी ८८ लाख ८७ हजार, पारंपरिक शाही मार्गाच्या १२ मीटर रुंदीकरणासाठी ६ कोटी २७ लाख ८९ हजार, तर मालेगाव स्टॅण्ड ते सरदार चौक रस्ता रुंदीकरणाच्या भूसंपादनाकरिता ४ कोटी ५० लाख रुपये याप्रमाणे एकूण १७ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम अदा केलेली आहे.
अन्य सात कामांसाठी ३७ कोटी ५५ लाख रुपये वर्ग करण्याला स्थायीने संमती दर्शविली आहे. (प्रतिनिधी)