शालेय विद्यार्थ्यांचे पाण्यावाचून हाल
By Admin | Updated: April 7, 2016 23:56 IST2016-04-07T22:52:37+5:302016-04-07T23:56:00+5:30
मालेगाव : बहुतांश शाळांमध्ये पाण्याअभावी गैरसोय

शालेय विद्यार्थ्यांचे पाण्यावाचून हाल
समाधान शेवाळे वडनेर
मालेगाव शहरातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्यामुळे पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरात शाळा- महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात असून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असताना शहरात मोठे शैक्षणिक संकुल व विविध शैक्षणिक संस्था असल्यामुळे शिक्षणासाठी शहराचा नावलौकिक वाढला आहे.
सध्या मालेगावच्या तपमानात दिवसेंदिवस वाढ होत असून सुमारे ४३ अंशापर्यंत तपमान गेल्याने उष्माघाताने जगणे असह्य झाले आहे, असे असतानाही शहरामध्ये असलेल्या नामांकित शाळा-महाविद्यालयांमध्ये साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याचे दिसून येत आहे. शहरामध्ये शिक्षणासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असतात.
सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने घसा कोरडा पडत असून पाण्याची तहानही वाढत असते. विद्यार्थी घरूनच पाण्याची बाटली घेऊन येतात परंतु पाण्याची तहान वाढल्याने ती बाटली लवकरच संपते. अशा स्थितीत काही शाळा-महाविद्यालयांमध्ये पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे.
मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये पाण्याची सोय नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या वेळी विविध सोयीसुविधांचे दर्शन घडविले जाते परंतु काही दिवसातच अशी परिस्थिती उद्भवते त्यामुळे भर उन्हाळ्यात शाळा- महाविद्यालयांकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी अपेक्षा पालकवर्गाकडून व्यक्त होत आहे.