शाळा दुरुस्तीच्या कामात कळवण, इगतपुरीला झुकते माप
By Admin | Updated: December 2, 2014 00:56 IST2014-12-02T00:53:32+5:302014-12-02T00:56:00+5:30
२०१ शाळांची होणार दुरुस्ती; चार कोटींचा निधी

शाळा दुरुस्तीच्या कामात कळवण, इगतपुरीला झुकते माप
नाशिक : जिल्हा परिषद सेस निधीच्या ७५ लाखांच्या शाळा दुरुस्तीचा निधी रस्ते दुरुस्तीवर वळविण्यावरून सदस्यांमध्ये नाराजी असतानाच आता जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या चार कोटींच्या निधीतून सर्वाधिक शाळा दुरुस्तीची कामे कळवण व इगतपुरी तालुक्यात घेण्यात आल्याने सदस्यांमध्ये नाराजी वाढण्याची आहे. विशेष म्हणजे २५ आॅगस्ट २०१४ रोजी मंजूर झालेल्या या कामांची यादी दोन तेअडीच महिन्यानंतर आता अचानक सदस्यांना पाहावयास मिळाल्याने सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सन-२०१४-१५ या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा नियोजन समितीने बिगर आदिवासी योजनेअंतर्गत या प्राथमिक शाळांच्या इमारत दुरुस्तीकरिता चार कोेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शाळा दुरुस्तीचे अनुदान प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतरच कामांना सुरुवात करण्यात यावी, अशी मुख्य अट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या कामांना मान्यता देण्याच्या आदेशात नमूद केली आहे. या शाळा मंजुरीच्या कामांवर माजी पदाधिकाऱ्यानीच वर्चस्व राखल्याचे एकूणच शाळा दुरुस्ती मंजुरीच्या २०१ कामांच्या यादीवरून दिसून येत आहे. कळवण, इगतपुरी तसेच चांदवड, पेठ व देवळा तालुक्यांना झुकते माप देण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. (प्रतिनिधी)