पंचवटीत शाळेची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:09+5:302021-02-05T05:41:09+5:30
पंचवटीत काही ठिकाणी शाळेत रांगोळी काढून विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळा सुरू झाल्यावर शाळेत आलेल्या पाचवी ते ...

पंचवटीत शाळेची घंटा वाजली
पंचवटीत काही ठिकाणी शाळेत रांगोळी काढून विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळा सुरू झाल्यावर शाळेत आलेल्या पाचवी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांची सुरुवातीला थर्मामीटर लावून तपासणी करण्यात आली. त्यानंतर वर्गखोलीत जाताना वर्गाच्या बाहेर हात धुण्याची व्यवस्था करण्यात येऊन विद्यार्थ्यांना फिजिकल डिस्टन्सिंग नियम पाळून वर्गात सोडले जात होते.
संसर्ग टाळण्यासाठी मधली सुट्टी रद्द करण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांना वर्गात सामाजिक अंतर ठेवून एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे आसनव्यवस्था करण्यात आली होती. शाळेत येताना विद्यार्थ्यांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होते, तर येताना स्वतःची पाण्याची बाटली घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या व जेवणाची सुट्टीदेखील रद्द करण्यात आल्याचे शाळा व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.
महापालिका, खाजगी शाळा प्रवेशद्वारावर शिक्षक विद्यार्थ्यांची तपासणी करून वर्गात सोडत होते, तर खाजगी मनपा शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेत स्वतःच्या जबाबदारीवर पाठवत आहोत, याबाबत संमतीपत्रक भरून घेण्यासाठी आणि स्वाक्षरीसाठी पालकांना शाळेत बोलविले होते. कोरोना संसर्ग संपलेला नाही, त्यामुळे काही पालकांनी आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठविण्याचे धाडस केले तर काहींनी शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला नसल्याने आजच्या शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थीसंख्या कमी असल्याने शाळांत काहीसा शुकशुकाट पसरला असल्याचे दिसून आले.
(फोटो २७ पंचवटी)