‘तुमच्या पिशवीत गांजा आहे का...’ असे म्हणत ज्येष्ठाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:12+5:302021-03-13T04:26:12+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रकाश परब (६७, रा. आशिष अपार्टमेंट, अल्को मार्केट ) हे बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ...

‘तुमच्या पिशवीत गांजा आहे का...’ असे म्हणत ज्येष्ठाला लुटले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रकाश परब (६७, रा. आशिष अपार्टमेंट, अल्को मार्केट ) हे बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घराजवळील राजीवनगर येथील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी पिशवी घेऊन गेले होते. भाजी मार्केटमधून भाजी घेऊन घरी परत येत असताना पिठाच्या गिरणी समोर राजीवनगर येथे आले असता दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांना थांबविले. ‘मला साहेबांनी पाठवले आहे. मी पोलीस असून या परिसरामध्ये गांजा विकला जातो आहे, तुमच्या पिशवीत गांजा आहे का दाखवा’ असे म्हणून त्याच्याकडील बनावट ओळखपत्र दाखवले. त्या इसमाने पिशवी तपासून तुमच्याकडील दागिने, पैसे पिशवीत ठेवा. त्यावेळी परब गोंधळून व घाबरून गेले तेव्हा तेथून जाणाऱ्या एका इसमाला त्या अज्ञात इसमाने बोलावून घेतले व त्यालादेखील तुझ्याकडील पैसे, दागिने काढून तुझ्याकडील पिशवीमध्ये टाकायला सांगितले. त्याने खिशातील पैसे पिशवीत टाकले व त्यानंतर परब यांनादेखील दागिने, पैसे काढण्यास सांगितले म्हणून त्यांनीदेखील घाबरून गळ्यातील २५ ग्रॅमची सोन्याची चेन सुमारे ८४ हजार रुपये व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण सुमारे एक लाखाचा ऐवज त्यांच्याजवळील पिशवीत ठेवला व पिशवीला गाठ मारण्याच्या बहाण्याने परब यांच्या हातातून पिशवी घेऊन त्यातील दागिने काढून घेऊन दुचाकीवरून दोन्ही चोरटे राजीवनगरच्या दिशेने निघून गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली. याप्रकरणी परब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तोतया पोलिसांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.