सावरकर विश्व साहित्य संमेलन मॉरिशसला
By Admin | Updated: August 30, 2015 23:02 IST2015-08-30T23:01:46+5:302015-08-30T23:02:16+5:30
बोधचिन्ह अनावरण : अध्यक्षपदी जाजू

सावरकर विश्व साहित्य संमेलन मॉरिशसला
नाशिक : शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने पाचवे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलन येत्या ५ सप्टेंबर रोजी मॉरिशस येथे आयोजित करण्यात आले असून, अध्यक्षपदी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि सावरकरप्रेमी श्याम जाजू यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश गायकवाड यांनी दिली आहे. दरम्यान, संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण उद्योगपती डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यंदा संमेलनाचे पाचवे वर्ष असून, यापूर्वी प्रतिष्ठानने अंदमान, श्रीलंका, नेपाळ, थायलंड याठिकाणी संमेलन भरविले आहे. मॉरिशस येथे होणाऱ्या संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी मॉरिशसचे सांस्कृतिकमंत्री सीताराम बाबू यांची निवड करण्यात आली असून, संमेलनाला उद्योगपती डी. एस. कुलकर्णी, मराठी भाषक युनियन मॉरिशसचे अध्यक्ष बालाजी मारुती आणि महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष बलराज नारु प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मॉरिशस येथील संमेलन हे तेथील मराठी मंडळांच्या सहकार्याने साकार होत असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. मॉरिशस येथे सुमारे ७० टक्के जनता ही भारतीय असून त्यांना सावरकरांच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)