वटपूजनाहून येणाऱ्या महिलांचे ‘सौभाग्यलेणं’ लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:44+5:302021-06-26T04:11:44+5:30
लॉकडाऊनमध्ये सोनसाखळी चोरण्याच्या घटना बंद झाल्या होत्या. अनलॉकनंतर महिला व नागरिक घराबाहेर पडू लागल्याने सोनसाखळी चोर पुन्हा सक्रिय झाल्याचे ...

वटपूजनाहून येणाऱ्या महिलांचे ‘सौभाग्यलेणं’ लांबवले
लॉकडाऊनमध्ये सोनसाखळी चोरण्याच्या घटना बंद झाल्या होत्या. अनलॉकनंतर महिला व नागरिक घराबाहेर पडू लागल्याने सोनसाखळी चोर पुन्हा सक्रिय झाल्याचे या घटनेवरुरून दिसून येते. गुरुवारी (दि. २४) वटसावित्री पौर्णिमा असल्याने ठिकठिकाणी महिला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. साहजिकच अंगावर सोन्याचे दागदागिने घालून महिला पूजेला जात असल्याची संधी सोनसाखळी चोरांनी साधली.
येथील वरंदळ मळ्यात देवीच्या मंदिराजवळ असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी शिवाजीनगर, संजीवनीनगर भागातील महिला वडाच्या झाडाकडे आल्या होत्या. दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागात राहणाऱ्या हेमांगी विष्णू बलक (५६) या पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे ७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत दुचाकीहून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून लांबवली. त्यानंतर चोरट्यांनी थोडे अंतर पुढे जाऊन वरंदळ मळ्याजवळ पायी जाणाऱ्या अलका बबन बिन्नर (५१) या महिलेच्या गळ्यातील साडेसहा तोळे वजनाची सोन्याची पोत लांबवली. दुचाकीवरून आलेले दोन चोरटे सुसाट वेगाने पसार झाले. याप्रकरणी अलका बिन्नर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन सोनसाखळी चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या. पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी अधिक तपास करीत आहेत.
इन्फो
सीसीटीव्ही फूटेजची तपासणी
लॉकडाऊनमध्ये शांत असलेले सोनसाखळी चोर अनलॉकनंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्याचा फटका सिन्नरच्या उपनगरातील दोन महिलांना बसला. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. ज्या मार्गावरून चोरटे आले-गेले त्या मार्गावरील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळविले असून त्यादृष्टीने चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.