बागलाण तालुक्यातील सरपंच आक्रमक
By Admin | Updated: September 1, 2015 22:46 IST2015-09-01T22:45:55+5:302015-09-01T22:46:45+5:30
आढावा बैठक : वाळू तस्करीवरून वादंग; प्रांताधिकाऱ्यांनी केला जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

बागलाण तालुक्यातील सरपंच आक्रमक
सटाणा : पावसाने तब्बल महिन्यापासून दडी मारल्याने भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे बागलाण तालुक्यातील जनतेपुढे यंदा पावसाळ्यात जलसंकट उभे ठाकले असून, आठ आठ दिवस पाणी कपातीमुळे खेड्यापाड्यातील जनता आणि जनावरे पाण्यासाठी कासावीस झाली आहेत. सोमवारच्या टंचाई बैठकीत तालुक्यातील सर्वच सरपंचांनी पाण्यासाठी टाहो फोडत जलसंकटावर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली.
दरम्यान, या बैठकीत जलसंकटाला बेसुमार वाळूउपसाच कारणीभूत असल्याचे निदर्शनास आणून देत वाळूमाफियांची महसूल आणि पोलीस यंत्रणेशी सलगी असल्याचा आरोप करण्यात आला. वाळूउपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर भरदिवसा हल्ले होत असल्याचा गंभीर आरोप उपस्थित सरपंचांनी केल्याने बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी आमदार दीपिका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस तालुक्यातील सर्व सरपंच, प्रांत संजय बागडे, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. सुरुवातीलाच काही ज्येष्ठ सरपंचांनी बैठकीवर आक्षेप घेत फक्त टंचाई आराखडा तयार करण्याचे आदेश होतात प्रत्येक्षात मात्र कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना होत नसल्याने हा सर्व फार्स असल्याचे सांगून प्रशासनाच्या उदासीनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत चव्हाण यांनी गंभीर दखल घेत टंचाईच्या उपाययोजनाच्या कामात कोणी कसूर केल्यास त्याची गय केली जाणार अशा कडक शब्दांत अधिकाऱ्यांना फटकारले. तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे हरणबारी आतण केळझर हे दोन्ही मध्यम प्रकल्प अद्याप भरले नाही. तसेच आठ लघुप्रकल्प कोरडीच असल्याने काटवन, मोसम, करंजाडी, हत्ती, कान्हेरी, आरम, गिरणा आणि पूर्व बागलाणमध्ये प्रचंड जलसंकट उभे ठाकले आहे. पावसाअभावी पिके करपून लागली आहेत. गुरांना चारा नाही. विहिरींनी तळ गाठल्यामुळे गावागावात आठ आठ दिवस पाणी मिळत नाही, अशी भयावह परिस्थिती उपस्थित सरपंचांनी कथन केली. या संकटावर मात करण्यासाठी पाणी आडवा, पाणी जिरवा सारखे कार्यक्र म प्रभावीपणे राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वृक्ष लागवडीवर भर देऊन त्यांच्या संवर्धनासाठी सामूहिकरीत्या प्रयत्न करावेत, असा सूरही या बैठकीत निघाला. बैठकीस पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, उपसभापती वसंतराव भामरे, महेंद्र भामरे, माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, सुनीता पाटील, प्रा. अनिल पाटील, प्रशांत बच्छाव, पं. स. सदस्य वीरेश घोडे, लक्ष्मण सोनवणे, जयराम अहिरे, सतीश विसपुते, सोमनाथ सोनवणे, भास्कर बच्छाव, रखमाबाई सोनवणे, मायावती धिवरे, अहिल्याबाई माळी यांच्यासह जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राघो अहिरे, राजेंद्र सोनवणे, नारायण खैरनार, अशोक सावंत, अनिल बोरसे, नामपूरचे सरपंच प्रमोद सावंत, संजय पवार, मंगेश पवार, प्रवीण भामरे, किशोर ह्याळीज, शरद भामरे, शक्ती दळवी, किरण बिरारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)