सारंगखेडा : छत्रपती शिवरायांनी ज्या बाजारातून केली होती चेतकची खरेदी पर्यटन मंत्रालयाकडून त्या घोडेबाजाराला पर्यटनाची झळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 22:58 IST2017-12-13T22:50:29+5:302017-12-13T22:58:05+5:30
राजस्थानमधील पुष्कर मेळ्यातील उंटांच्या बाजाराप्रमाणे असला तरी अद्याप याविषयीच्या माहितीचा प्रचार-प्रसार फारसा झालेला नाही. त्यामुळे सारंगखेडा अश्व बाजाराविषयी अनभिज्ञता अधिक आहे. या सारंगखेड्याला पर्यटनाचे स्वरुप देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पावले उचलली आहे

सारंगखेडा : छत्रपती शिवरायांनी ज्या बाजारातून केली होती चेतकची खरेदी पर्यटन मंत्रालयाकडून त्या घोडेबाजाराला पर्यटनाची झळाली
नाशिक : नंदूरबार जिल्ह्यातील तापीच्या खोºयावर वसलेल्या सारंगखेड्यामधील घोडेबाजाराला केंद्र व राज्य सरकारने पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यटन विकास महामंडळाने यासाठी प्रयत्न करत ‘चेतक महोत्सव’ भरविला आहे. हा महोत्सव महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले. नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सारंगखेडा या गावात अनादी काळापासून विविध प्रजातीच्या घोड्यांचा बाजार भरतो. हा बाजार राजस्थानमधील पुष्कर मेळ्यातील उंटांच्या बाजाराप्रमाणे असला तरी अद्याप याविषयीच्या माहितीचा प्रचार-प्रसार फारसा झालेला नाही. त्यामुळे सारंगखेडा अश्व बाजाराविषयी अनभिज्ञता अधिक आहे. या सारंगखेड्याला पर्यटनाचे स्वरुप देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पावले उचलली आहे. महामंडळ व चेतक महोत्सव समितीच्या माध्यमातून येथे तीन तारखेपासून ‘चेतक फेस्टीवल-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर झगडे यांनी पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत झगडे यांनी माहिती देताना सांगितले, सारंगखेड्याचा चेतक महोत्सव पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये देशाच्या कानाकोप-यासह विदेशातही पोहचलेला असेल. गुजरातमधील रण महोत्सव, राजस्थानमधील पुष्करचा मेळा याप्रमाणे ‘चेतक महोत्सव’ नावारुपाला येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटन मंत्रालयाने यादृष्टीने प्रयत्न सुरू केले असून मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत अश्व संग्रहालय इमारतीचे भूमिपूजन गेल्या आठ तारखेला पार पडले. पर्यटकांचा वर्षभर वावर रहावा, यासाठी सारंगखेड्याला अश्व संग्रहालय उभारले जात आहे. रोजगारनिर्मिती आयटी किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये जेवढी गुंतवणूक करु न होत नाही तेवढी गुंतवणूक पर्यटन क्षेत्रात केल्यावर होते, हे डोळ्यापुढे ठेवून ‘चेतक फेस्टिव्हल’ भरविल्याचे झगडे म्हणाले. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे उपस्थित होते. येत्या २ जानेवारी रोजी महोत्सवाची सांगता होणार आहे.
घोड्यांची सौंदर्य, शर्यत स्पर्धा, नृत्य स्पर्धा महोत्सवाचे आकर्षण
देश-विदेशातील विविध प्रजातीच्या हजारो घोड्यांचा भरणारा बाजार. यावेळी घोड्यांची सौंदर्य, शर्यत स्पर्धा, नृत्य स्पर्धा. सारंगखेड्यात यंदापासून पर्यटकांसाठी महामंडळाने वातानुकूलित व विनावातानुकूलित तारांकित हॉटेलला लाजविणारे तंबूद्वारे निवास व्यवस्था केली आहे. घोड्यांच्या विविध स्पर्धांसोबत घोडेसफारीची संधी, साहसी क्रिडा प्रकार, तापीच्या पात्रात नौकानयन, आदिवासी लोककलांचे सादरीकरण आदि उपक्रम आयोजित केले आहे.