फडणवीसांबाबत सपकाळांचे वक्तव्य चुकीचे, तुलना करताना सारासार विचार गरजेचा-छगन भुजबळ

By संकेत शुक्ला | Updated: April 6, 2025 19:17 IST2025-04-06T19:17:14+5:302025-04-06T19:17:42+5:30

'देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला बोटही लावलेले नाही. '

Sapkal's statement about Fadnavis is wrong, overall thinking is needed while comparing - Chhagan Bhujbal | फडणवीसांबाबत सपकाळांचे वक्तव्य चुकीचे, तुलना करताना सारासार विचार गरजेचा-छगन भुजबळ

फडणवीसांबाबत सपकाळांचे वक्तव्य चुकीचे, तुलना करताना सारासार विचार गरजेचा-छगन भुजबळ

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. औरंगजेबाचा क्रूर इतिहास सगळ्यांना माहीत आहे. फडणवीस यांनी कुणाला बोटही लावलेले नाही. त्यामुळे ही तुलना अनुचित असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. टीका अथवा तुलना करताना सारासार विचार गरजेचा असल्याचेही ते म्हणाले.

रामनवमीनिमित्त रविवारी (दि.६) काळारामाच्या दर्शनासाठी आले असता माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. रामाचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो, असे सांगत भाजपच्या स्थापना दिवसानिमत्त त्यांनी पक्षाला शुभेच्छा दिल्या. भाजपकडून देशसेवा घडावी हीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. मनसेने केलेल्या आंदाेलनाची दखल सरकारने घेतली आहे.

परंतु देशभरातून बदली होऊन येणाऱ्या नागरिकांना प्रत्येक राज्यातील भाषा येईलच असे नाही त्यामुळे हा मुद्दाही आंदोलकांनी समजून घेतला पाहिजे, असा टोला भुजबळ यांनी आंदोलनावर लगावला. औरंगजेबाच्या कबरीबाबत सुरू असलेल्या आंदोलनावर जास्त भाष्य न करता आता आपल्याला पुढे जायला हवे, आपल्या अनेक वास्तू सुधारणेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची सुधारणा व्हायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

वेगळ्या युद्धाशी लढण्याची शक्ती मिळो...
ट्रम्प यांनी कराची नवी रचना करून वेगळ्या जागतिक युद्धाला सुरुवात केली आहे. भारतालाही त्याचा सामना करायचा आहे. भारतसुद्धा त्यातील फायदे- तोटे बघून निर्णय घेईल. या परिस्थितीतून आपल्याला पुढे जायचे आहे. त्यासाठी आपल्याला शक्ती मिळो, अशी प्रार्थना श्रीरामाकडे केल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Sapkal's statement about Fadnavis is wrong, overall thinking is needed while comparing - Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.