सप्तशृंगगडावर दरड कोसळली!
By Admin | Updated: June 13, 2017 00:42 IST2017-06-13T00:42:45+5:302017-06-13T00:42:59+5:30
संरक्षक जाळीने तारले : जीवितहानी नाही; दोन मोठे दगड वरच अडकले

सप्तशृंगगडावर दरड कोसळली!
लोकमत न्यूज नेटवर्क
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साडेतीन पीठांमधील अर्धेपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता मोठी दरड कोसळली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्त हानी झाली नाही. मंदिर परिसरात भाविकांच्या रक्षणासाठी ज्या संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत त्यामध्ये दोन मोठे दगड अडकल्याने अनर्थ टळला.
कोसळलेल्या एका दगडाचे वजन अंदाजे पाचशे ते सहाशे किलो आहे.
सप्तशृंगगड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंदिराच्या जवळच असलेले दोन कडे हे सुटलेले असल्याने त्यांच्यासाठी संरक्षक जाळी लावण्यात आली होती. सोमवारी चार वाजेच्या सुमारास पाऊस थांबला. पावणेपाच वाजता प्रचंड आवाजाने गड हादरला. काय होते आहे, हे कळण्याच्या आतच मंदिराच्या बाजूला सुटलेल्या दोन कड्यांपैकी एक दरड वेगाने खाली आली. मंदीर आणि भाविकांच्या संरक्षणासाठी या परिसरात संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. या जाळीत कोसळलेल्या दरडीचे दोन दगड अडकले आणि मंदीर व भाविकांवरील संकट टळले. ही संरक्षक जाळी नसती तर दरड सरळ मंदिराच्या परिसरात कोसळली असती व मंदिराची हानी मोठ्या प्रमाणात झाली असती. ज्यावेळी दरड कोसळली तेव्हा मंदिरात थोडेच भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. दरड कोसळताच सर्वांनी पळ काढला.
दरड कोसळल्याच्या आवाजाने सर्व ग्रामस्थ व व्यापारी बांधवांमध्ये घबराट पसरून ते रस्त्यावर आले. परंतु कुठलीही हानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भगवतीचे दर्शन सुरळीत दरड कोसळल्यानंतर सर्वच भाविकांनी गडाखाली धाव घेतली मात्र हे दगड संरक्षक जाळीमध्ये अडकल्याचे समजताच सर्वांना हायसे वाटले. या घटनेनंतर काही काळ गडावर कोणी जात नव्हते; पण कालांतराने दर्शन पुन्हा सुरू झाले.