संजय वाघ यांना बालसाहित्यिक पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:20 IST2019-07-17T01:19:43+5:302019-07-17T01:20:10+5:30
मुलांनी पुस्तके वाचावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांनी प्रथम टीव्ही, मोबाइलपासून दूर राहत पुस्तके वाचावीत. आपण त्यांच्यासमोर हा आदर्श घालून दिला तरच मुलांचा पुस्तक वाचनाकडील कल वाढेल असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. त्याआधी सावाना बालभवनच्या वतीने ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक संजय वाघ यांना सर्वोत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

डॉ़ अनिरूद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते उत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार स्वीकारताना संजय वाघ़ समवेत जयप्रकाश जातेगावकर, मिताली साळगावकर, सरिता सोनवणे, किशोर पाठक आदी़
नाशिक : मुलांनी पुस्तके वाचावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांनी प्रथम टीव्ही, मोबाइलपासून दूर राहत पुस्तके वाचावीत. आपण त्यांच्यासमोर हा आदर्श घालून दिला तरच मुलांचा पुस्तक वाचनाकडील कल वाढेल असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. त्याआधी सावाना बालभवनच्या वतीने ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक संजय वाघ यांना सर्वोत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर सावानाचे कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, किशोर पाठक, अॅड. अभिजीत बगदे, नगरसेविका सरिता सोनवणे, श्रीकांत बेणी, शंकर बर्वे, लेखक डॉ. विशाल तायडे, संजय करंजकर, ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील छायाची भूमिका साकारणारी मिताली साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. मनपाच्या ३२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी तीन लेखकांच्या पुस्तकांचे वाचन करून मतदान पद्धतीने वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या बालकादंबरीला सर्वाधिक पसंती दिल्याने त्यांना पुरस्कार जाहीर झाला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाघ यांना स्मृतिचिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हल्लीची मुले आजी-आजोबांकडून होणाºया संस्कारास मुकले असून, आत्मविश्वास हरवून बसले आहेत. त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘जोकर बनला किंगमेकर’ या बालकादंबरीची निर्मिती केल्याचे वाघ यांनी यावेळी सांगितले. तायडे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी बालकलाकार मिताली हिची उपस्थित विद्यार्थ्यांनीच विविध प्रश्न विचारून मुलाखत घेण्यात आली. प्रास्ताविक करंजकर यांनी तर सूत्रसंचालन सुरेखा बोºहाडे यांनी केले.
बालसाहित्य निर्मितीस चालना : डॉ़ धर्माधिकारी
यावेळी बोलताना डॉ. धर्माधिकारी यांनी या उपक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. तसेच सावानाच्या अशा उपक्रमांमुळे दर्जेदार बालसाहित्याच्या निर्मितीस अधिकाधिक चालना मिळेल, असे सांगितले. सरिता सोनवणे यांनी यंदा या उपक्रमात मनापच्या ३२ शाळाच सहभागी झाल्या असल्या तरी पुढील वर्षापासून सर्व ९० शाळा सहभागी होणार असल्याचे नमूद केले.