नगर परिषदेच्या सभेत कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:12 IST2018-03-03T00:12:41+5:302018-03-03T00:12:41+5:30
नगर परिषदेच्या विशेष सभेत रस्ते, गटारी, गाळ उपसा या कामांसोबतच स्मशानभूमी अनुषंगिक कामे अशा सुमारे चार कोटी खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

नगर परिषदेच्या सभेत कामांना मंजुरी
सिन्नर : नगर परिषदेच्या विशेष सभेत रस्ते, गटारी, गाळ उपसा या कामांसोबतच स्मशानभूमी अनुषंगिक कामे अशा सुमारे चार कोटी खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद चोथवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीस गटनेते हेमंत वाजे, मुख्य अधिकारी व्यंकटेश दुर्वास, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, नगरसेवक शैलेश नाईक, गोविंद लोखंडे, रूपेश मुठे, विजय जाधव, बाळासाहेब उगले, श्रीकांत जाधव, मंगला शिंदे, ज्योती वामने, सुजाता तेलंग, सुजाता भगत, विजया बर्डे, सुहास गोजरे, नामदेव लोंढे, रामनाथ लोणारे आदी उपस्थित होते. संगमनेर नाक्याजवळील स्मशानभूमीजवळ असलेला गावपाट बंदिस्त करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा येणार नाही याची काळजी घेण्याची मागणी नामदेव लोंढे यांनी केली. स्मशानभूमीत पाणी सुविधेसाठी कूपनलिका घेण्याचा निर्णय यावेळी झाला. हद्दवाढ क्षेत्रात विशेष अर्थसहाय्य योजनेंतर्गत ४० रस्त्यांची कामे होणार होती. यातील सात कामे दलित नगरोत्थान योजनेतून झाली आहेत, तर उरलेल्या ३३ रस्त्यांपैकी पाच कामांना जागेअभावी अडचण आली आहे. त्यामुळे शिल्लक निधीतून इतर प्रस्तावित कामांना मान्यता देण्यासाठी व उर्वरित निधी मागणी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नगरसेवक सुहास गोजरे व शीतल कानडी यांनी कामांच्या यादीचे वाचन करण्याची मागणी केली. साईनगरातील हांडे मळ्यात व श्रीनगर येथे बंदिस्त गटार कामांना मंजुरी देण्यात आली. चौदा चौक वाडा शॉपिंग सेंटरमधील भागात वाहनतळ सुविधा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. शहरातील नृसिंह मंदिरालगतचा पुरातन बारव बुजला गेला असून, त्यातील गाळाचा उपसा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. पुरातन ठेवा जपण्याचा प्रयत्न, शिवाय त्यात नैसर्गिक पाणी साठत असल्याने त्याचा उपयोग नागरिकांना करता येईल यादृष्टीने बारवाला गतवैभव मिळवून देण्यात येणार आहे. पूर्वी सिंहस्थ काळात येणाºया महंतांच्या बैठका या मंदिरात होत होत्या. या बारवाचा रामायणाशी संबंध असल्याने बारवातील गाळाचा उपसा करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.