सलमानच्या ट्विटचे नाशकात तीव्र पडसाद
By Admin | Updated: July 26, 2015 23:54 IST2015-07-26T23:54:33+5:302015-07-26T23:54:47+5:30
शिवसैनिक रस्त्यावर : कॉलेजरोड सिनेमागृहासमोर पुतळा दहन

सलमानच्या ट्विटचे नाशकात तीव्र पडसाद
नाशिक : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी अभिनेता सलमान खान याने वादग्रस्त वक्तव्य ट्विटरवर केले. त्याचे पडसाद रविवारी (दि.२६) शहरातही उमटले. शिवसैनिकांनी दुपारी एकत्र येत कॉलेजरोडवरील सिनेमागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ सलमानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत घोषणाबाजी के ली.
सलमान खान याने मेमनच्या फाशीच्या निकालावर वादग्रस्त लिखाण ट्विटरवर केले होते. या सलमानच्या विधानाचे देशभर तीव्र संतप्त पडसाद उमटले. बहुतांश शहरांमध्ये सलमानचा आठवडाभरापूर्वीच प्रदर्शित झालेला ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाचे शोदेखील बंद पाडण्यात आले. या वादग्रस्त विधानाचा निषेध शहरात शिवसैनिकांनी सलमानचा प्रतीकात्मक पुतळा जाळून केला. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कॉलेजरोवर काही शिवसैनिकांनी एकत्र येत हातात भगवे झेेंडे घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत सलमानविरोधी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. रविवार असल्यामुळे सिनेमागृहाच्या तिकीट विक्री केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. दरम्यान, पुतळा दहनानंतर शिवसैनिकांनी रस्त्यावरून मोर्चा केंद्राकडे वळवित तिकीट विक्री बंद पाडण्याची मागणी करत केंद्रासमोर ठिय्या मांडला. सुमारे अर्धा तास शिवसैनिकांनी या ठिकाणी संतप्त घोषणा देत सलमान खानचा निषेध नोंदविला तसेच आरोपी याकूब मेमनला त्वरित फासावर लटकविण्याची मागणी घोषणा देत केली. दरम्यान, सरकारवाडा पोलीसांना आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करणाऱ्या योगेश बेलदार, संदीप गायकर, चेतन शेलार, आशिष साबळे, शुभांगी नांदगावकर, रुपेश पालकर, आदित्य बोरस्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर तिकीट विक्री पूर्ववत सुरू झाली. शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे संध्याकाळच्या चित्रपटाचे शो उशिरा सुरू झाले होते. तसेच सिडको येथील त्रिमूर्ती चौकातील सिनेमागृहासमोरही शिवसैनिकांनी सलमान खानविरोधी आंदोलन केले. येथील तिकीट विक्रीही शिवसैनिकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. अंबड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)