संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी शिवशाहीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 23:56 IST2020-06-28T23:54:35+5:302020-06-28T23:56:55+5:30
आषाढ शुद्ध दशमी अर्थात मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची मानाची पालखी पंढरपूरकडे शिवशाही बसमधून प्रस्थान करीत आहे.

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी शिवशाहीतून
त्र्यंबकेश्वर : आषाढ शुद्ध दशमी अर्थात मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची मानाची पालखी पंढरपूरकडे शिवशाही बसमधून प्रस्थान करीत आहे.
या बसमध्ये सुमारे २० लोकांना जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. यात दोन पोलीस, दोन वैद्यकीय अधिकारी, एक मानकरी, दोन पुजारी, टाळकरी, एक विणेकरी, नऊ किंवा दहा विश्वस्त आदींचा सहभाग असेल. तर ज्येष्ठ विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, रामभाऊ मुळाणे यांना वयाचे कारण दाखवून बसमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. तथापि या तीनही ज्येष्ठ विश्वस्तांचे मत आहे की, आमच्याऐवजी आमच्या मुलांना परवानगी द्या, पण यादी होऊन गेल्यामुळे नवीन प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही असे समजते.
पायी दिंडी सोहळ्याप्रसंगी गावात वारकरी मोठ्या संख्येने येत असतात. दोन-तीन दिवस त्र्यंबकेश्वर परिसर मंदिर परिसर गजबजून जात असते. त्यानंतर पालखीला निरोप देताना संपूर्ण गाव एकवटतो. जणू त्र्यंबक मध्येच यात्रा भरली आहे असा भास झाल्याशिवाय राहात नाही, तर पंढरपूर यात्रा संपन्न झाल्यानंतर पाच दिवस पंढरपूरला पालखीचा मुक्काम होत असतो. विश्रांती घेऊन सोळा दिवसांचा परतीचा पायी प्रवास करून श्रावण महिन्यात नागपंचमीच्या आदल्या दिवशी भरपावसात थंडीने कुडकुडत पालखीचे आगमन होत असे. त्यावेळेसही मंदिरात जणू दिवाळी अवतरली आहे. कारण देव तब्बल चाळीस दिवसानंतर स्वगृही परतले!