साध्वी त्रिकाल भवंता यांचे घूमजाव
By Admin | Updated: September 1, 2015 23:53 IST2015-09-01T23:53:39+5:302015-09-01T23:53:55+5:30
मध्यस्थी केंद्र बैठक : आखाड्यांच्या स्नानाऐवजी इतर तारखांचा प्रस्ताव

साध्वी त्रिकाल भवंता यांचे घूमजाव
नाशिक : पर्वणीच्या दिवशी आखाड्यांच्या स्नानानंतर स्वतंत्र वेळ व जागेची मागणी करणाऱ्या साध्वी त्रिकाल भवंता यांनी मंगळवारी मध्यस्थी केंद्रात आपल्या मागणीवरून घूमजाव केले़ आखाड्यांच्या शाहीस्रानाच्या तारखांऐवजी इतर तारखांचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे़ या मागणीबाबत शासन आपली भूमिका ७ सप्टेंबरला स्पष्ट करणार आहे़
परी आखाड्याच्या साध्वी त्रिकाल भवंता यांनी पर्वणीत साधू-महंतांच्या स्रानानंतर स्वतंत्र वेळ व जागा मिळावी यासाठी प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता़ यावर मध्यस्थी केंद्रात तोडगा काढण्याची सूचना न्यायालयाने केली असता त्यास साध्वी व प्रशासन यांनी संमती दिली होती़ त्यानुसार सोमवारी दोन्ही पक्षांनी मध्यस्थी केंद्रामध्ये आपापली बाजू मांडली़ मात्र एकमत न झाल्याने मंगळवारी पुन्हा मध्यस्थी केंद्रात बैठक झाली़
मंगळवारी झालेल्या बैठकीत त्रिकाल भवंता यांनी पूर्वीच्या मागणीत बदल करीत आखाड्यांच्या शाहीस्रानाऐवजी इतर तारखांचा प्रस्ताव मध्यस्थी केंद्रात सादर केला़ त्यावर प्रशासनाने साध्वींनी सामान्य भाविकांप्रमाणे स्नान करण्यास हरकत नसल्याचे सांगत ७ सप्टेंबरला याबाबत शासन भूमिका स्पष्ट करेल, असे सांगितले़ तसेच मध्यस्थी केंद्रप्रमुखांनी शासनाचे व पोलिसांचे सर्व नियम पाळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा प्रकारे स्नान करण्याचा पर्याय सुचविला आहे़ (प्रतिनिधी)